वाल्मीकी श्रीनिवासा अय्यंगार्या हे मूळचे कर्नाटकातल्या अग्नी या गावचे. त्यांचे शिक्षण गणित या विषयात झाले. पण लहानपणापासून त्यांना शेतीवर संशोधन करण्याची ओढ होती. आपले शेतीतले पहिले प्रयोग त्यांनी अग्नी या गावीच केले. सूरपालाच्या वृक्षायुर्वेद ग्रंथात दिलेल्या शास्त्रीय पद्धती आणि तंत्रज्ञान यांचा विकास करण्याकरिता त्यांनी विदर्भात केशवपुरी येथे जमीन घेतली. तेथे २००३ ते २००४ या काळात त्यांनी अनेक प्रात्यक्षिके करून बघितली. भारतातल्या सोप्या पण परिणामकारक अशा शेतीतल्या पद्धतींचे पुनरुज्जीवन करणे, या उद्देशाने त्यांनी हे प्रयोग केले. या पद्धती जरी पारंपरिक असल्या तरी  या पद्धतींचे शास्त्रीय मूल्य वरच्या दर्जाचे आहे असे त्यांना आढळून आले.         

वृक्षायुर्वेदातील पद्धती आजच्या काळात सिद्ध करण्याच्या भावनेने पछाडलेल्या वाल्मीकी श्रीनिवासा अय्यंगार्या यांना २००४ सालच्या एप्रिल महिन्यात एक अनपेक्षित विचारणा झाली. तीसुद्धा अरुणाचल प्रदेशातल्या गंधर्वनगरीतून! त्या भागात चहाचे विपुल मळे आहेत. त्यातल्या एका चहा मळ्याच्या मालकाने त्याच्या मळ्यात सेंद्रिय पद्धत वापरून चहाचे पीक काढण्याची विनंती वाल्मीकींना केली.
चहा मळ्याच्या मालकाने केलेली ही विनंती स्वीकारावी की नाही याबाबत वाल्मीकी जरा साशंक होते. कारण तोवर त्यांनी चहाचे झुडूपही कधी पाहिले नव्हते. चहा मळ्याच्या मालकाशी चर्चा करताना मालकाचा कल आणि भूमिका त्यांना पटली आणि एक आव्हान म्हणून त्यांनी हे काम स्वीकारले. या कामाच्या निमित्ताने वृक्षायुर्वेदातील पद्धतींचे जे प्रयोग त्यांनी केशवपुरीत केले होते, त्यांचे उपयोजन करण्याची ही एक अनोखी संधी आपल्याला मिळत आहे, असे त्यांना वाटले.
अरुणाचलमध्ये जाण्यापूर्वी वाल्मीकींनी अनेक प्रकारची कुणपे तयार करून पाहिली होती आणि ती वापरूनही बघितली होती. मुळातच अभ्यासू वृत्तीचे असल्यामुळे त्यांनी त्या कुणपांचे गुण पडताळून पाहिले होते. यांतील काही द्रवरूप कुणपांचा दुहेरी उपयोग होतो असे त्यांना आढळून आले होते.
सुधा गोवारीकर (पुणे)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

आजचे महाराष्ट्रसारस्वत : १८ फेब्रुवारी
१८२३ > गोपाळराव हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांचा जन्म. ‘ईश्वराने स्त्री व पुरुष सारखेच केले व उभयतांचे अधिकार समसमान आहेत’ किंवा ‘आळशीपणामुळे देश भिकारी झाला’ अशी मते मराठीत १५२ वर्षांपूर्वी मांडणारे लिखाण त्यांनी केले! १९४८ ते १९५० या काळात भाऊ महाजन यांच्या ‘प्रभाकर’ या साप्ताहिक वृत्तपत्रात ‘लोकहितवादी’ या नावाने त्यांनी निबंध लिहिले, हीच ‘शतपत्रे’. पुढे यात आणखी आठ निबंधांची भर घालून हे पुस्तक प्रथम प्रकाशित झाले. शतपत्रांतून त्यांनी ‘धर्मसुधारणेची कलमे’ मांडून मूर्तिपूजा, जातिभेद, कर्मकांडे, हुंडा, बहुपत्निकत्व यांना विरोध; तर शिक्षण व उदारमतवाद यांचा पुरस्कार केला. ‘जाती अस्तित्वात आहेत, तोवर त्यांच्यात द्वेषमत्सर तरी असू नये’ असे त्यांचे मत होते.   
१९३६ > स्वातंत्र्योत्तर भारतातील अनेक समस्यांची वैचारिक चिकित्सा करणारे विचारवंत वसंत पळशीकर यांचा जन्म. ‘समाज प्रबोधन पत्रिका’ व ‘नवभारत’चे संपादक म्हणून त्यांनी काही काळ काम केले आहे. ‘सत्याग्रही सॉक्रेटिसचे वीरमरण’, तसेच ‘जमातवाद’, ‘चौकटीबाहेरचे चिंतन’  ‘प्रादेशिक नियोजन’, ‘स्वतंत्र राष्ट्रांचा उदय व लोकशाहीचे आव्हान’ ही त्यांची पुस्तके होत.
संजय वझरेकर

वॉर अँड पीस : घाम खूप येणे : भाग – १
भारतीय विमानदलात काम करीत असताना, एका बंगाली मुलाची दोन वर्षेच नोकरी झालेली असूनही वैद्यकीय कारणामुळे नोकरी सोडून जात असताना गाठ पडली. कुतूहल म्हणून इतक्या लवकर नोकरी सोडावी लागण्याचे कारण विचारले असताना त्याने हातात धरलेली ‘घामाने चिंबलेली’ क्लिअरन्स फाईल दाखविली. पायांत बूट व मोजे असल्यामुळे पायाची लक्षणे काही कळत नव्हती. पण तळहात अक्षरश: घामाने निथळत होते. चहा घेता घेता त्याच्या विकाराबद्दलची बरीच चर्चा झाली. त्याचे काम कारकून म्हणून होते. हाताला महाप्रचंड घाम येत असल्यामुळे कोणताच कागद हाताळावयास तो सर्वथैव नालायक, म्हणून त्याला बाहेर जावे लागत  होते. तेव्हापासून अशा स्वरुपाच्या रुग्णांना कसे बरे करता येईल, असा विचार मी त्याकाळी वैद्य नसूनही सतत घोळत असे.
सुमारे तीस वर्षांपूर्वी ‘जरा कोणी मोठे माणूस मला बोलले तर दरदरून घाम फुटतो,’ असे सांगत एक जण आले. त्याला धने पाणी, मनुका, नारळपाणी, कोहळ्याच्या वडय़ा यांचा वापर कर असे सांगितले. त्यामुळे आत्मविश्वास वाढला. त्याला बरे वाटले.
या तक्रारीमुळे ग्रस्त असणारे रोगी पाहिल्याशिवाय त्यांची व्यथा आपल्या लक्षात येत नाही. घामाने हातरुमाल भिजतात. कापडाचा तुकडा सुद्धा हातात धरता येत नाही. एवढेच काय, दोन, पाच मिनिटे पैशाची नोट दुसऱ्याला देण्याकरिता हातात ठेवली तरी ओली होते, असे रोगी मी पाहिले आहेत. यातील बऱ्याचशा रोग्यांना थंडीत व पावसाळ्यात त्रास होतो, तर काहींना उन्हाळ्यात व पावसाळ्यात हा त्रास वाढतो. कोणी याच विकारास ‘सर्दी’ होते असे म्हणतात. तर काही याला खूप घामाने त्रास होतो असे म्हणतात. घाम म्हणावे तर ‘पित्तं तु स्वेदरक्तयो: ।’ (पित्त, घाम व रक्त यांचा एकमेकांशी जवळचा संबंध आहे) असे शास्त्र सांगते. तसेच सर्दी असेल तर कफाचा विचार करावा लागतो, असे व्यवहारात दिसते. एकूण काल समजावून घेऊन कारणाकडे जाणे, हे रोग आटोक्यात आणण्यासाठी, औषधी योजनेकरिता उपयोगी पडते.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी..  : भाषा. विज्ञान आणि प्रज्ञा
हल्लीच्या शिक्षण पद्धतीत काटछाट करून फक्त तीन-चारच संबंधित विषयांचा एक ग्रूप असतो, असे ऐकतो तेव्हा माझ्यासारखे हल्लीचे अनेक विद्यार्थी ज्यांना भाषा मनापासून आवडतात ते वाळीत टाकल्यासारखे होत असणार. भाषा हे माझे बलस्थान नव्हे तर माझ्या ‘जीवालागी वर्म’ आहे. विज्ञान सुंदर भाषेत उदाहरणे देऊन सांगता येते आणि या उदाहरणांमधूनच मी विज्ञान शिकलो. माझ्या डायस सरांनी मला सहा प्रश्न शिकवले होते. ही विकृती कुठपासून कोठपर्यंत आहे, ही विकृती कशामुळे झाली आहे, ही किती खोल आहे, या विकृतीमुळे या रुग्णाला काय अपाय झाला आहे आणि ही विकृती बरी करताना जे करावे लागेल त्यामुळे याचा किती टक्के फायदा होणार आहे आणि हे करताना त्याच्या जिवाला अपाय होण्याची शक्यता आहे का? या प्रश्नांमधे कोठे काय विज्ञान आहे. सोप्या आणि सुंदर भाषेत विचारलेले हे प्रश्न मानवी दुखण्याशी संबंधित आहेत.
     आमच्यात मोठय़ा सर्जन लोकांना ‘बडा मोची’ म्हणतात. माझे सर म्हणत असत. थोडे कौशल्य असेल तर कापाकापी करणे आणि टाके मारणे कोणीही करू शकतो. त्याच्या मागची आखणी महत्त्वाची असते आणि ही आखणी योग्य असेल तर निसर्ग आपल्याला मदत करायला आतुर असतो. नाहीतर तोच निसर्ग आपल्याच नव्हे तर आपण केलेल्या आक्रितामुळे रुग्णाच्या छाताडावर बसतो. माणसाबद्दलचे सोडा विश्व, विश्वोत्पत्ती वगैरे गहन विषयही फार सुंदर भाषेत किंबहुना कवितेत सांगता येतात. हीच ओवी बघा.
। जिथे वेद मुके बनले। मन आणि वायु पांगुळले।
रात्रीवाचून सुर्यचंद्र मावळले। तिथे मी।।
रात्र नसून मावळेला हा सूर्य आणि म्हणून चंद्रही असे कधी असते का? विश्वाच्या सुरवातीला हेच होते. अहो पंचमहाभूतेच जर नव्हती तर आकाश कोठले आणि आकाश नसले तर सूर्यचंद्र फिरणार कुठे. आकाश नाही म्हणून वारा नाही. तोही पांगुळला. पण खरी मेख मन ह्य़ा शब्दात आहे. वारा मनाचा भाऊ आहे कारण भटकण्यात दोघे पटाईत. वारा तर नाहीच पण ज्याबद्दल मनातच माहिती गोळा होऊ शकते ते मनच जर नाही तर विश्वाच्या जन्माचा विचार करणार तरी कसा आणि मग ओवीतला पहिला चरण कळतो. ‘जिथे वेद मुके बनले’ अहो ज्या गोष्टी मनात चितारायच्या त्या गोष्टीसाठी लागणारे मनच मुळी नाही.
इथे प्रज्ञा हवी आणि नंतर वाचा हवी. परंतु त्या आधी प्रज्ञेबद्दलच्या ह्य़ा ओव्या बघा.
विश्वरूप बघितले। ही तर नवलाई। पण न बघताही दिसले। ही तर नवी नवलाई।।
प्रकाशात सारे दिसते। मग अंधारात गुडुप होते। तसे हे नव्हते। दिव्यरूप.
रविन मायदेव थत्ते 
rlthatte@gmail.com