डॉ. वसंतराव गोवारीकरांच्या संशोधन कार्याची सुरुवात अवकाश तंत्रज्ञानक्षेत्रापासून जरी झाली असली; तरी आपल्या देशात पडणाऱ्या मोसमी पावसाचा अंदाज अचूकतेने व्यक्त करण्यासाठी त्यांचं योगदान मोलाचं आहे.

भारतीय उपखंडातल्या सृष्टीचा जीवनाधार असलेला मोसमी पाऊस हा अत्यंत बेभरवशाचा आणि लहरी! तो कधी जोमाने बरसतो, तर कधी पाठ फिरवतो; कधी लवकर येतो, तर कधी वाट बघायला लावतो. हवामानातील कोणकोणत्या घटकांवर त्याचा हा लहरीपणा अवलंबून आहे, याचा वेध हवामान शास्त्रज्ञ घेतात आणि त्यावरून मोसमी पावसाचा अंदाज बांधतात.

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात गिल्बर्ट वॉकर नावाच्या अधिकाऱ्यानं देशाच्या तीन भागांसाठी स्वतंत्र अंदाज देणं सुरू केलं. द्वीपकल्पीय भारत, ईशान्य भारत आणि वायव्य भारत असे ते तीन भाग होते. मात्र १९८५ आणि १९८६ साली या प्रारूपाच्या आधारे दिलेला पावसाचा अंदाज खरा ठरला नाही. या दोन्ही वर्षी दुष्काळ पडला. १९८७ सालीसुद्धा दुष्काळाने आपलं भीषण स्वरूप दाखवलं.

त्यामुळे १९८८ पासून देशानं पावसाच्या अंदाजासाठी स्वतंत्र प्रारूप स्वीकारलं. डॉ. वसंतराव गोवारीकरांच्या मार्गदर्शनाखाली पावसाचा अंदाज देण्यासाठी तयार करण्यात आलेलं हे प्रारूप म्हणजे भारतीय हवामानशास्त्रज्ञांनी विकसित केलेलं पहिलं प्रारूप होतं. त्यात पुणे वेधशाळेतील शास्त्रज्ञ डॉ. वाचस्पती थपलियाल यांचा प्रमुख वाटा होता.

‘गोवारीकर प्रारूप’ या नावाने प्रसिद्ध झालेलं हे प्रारूप हवामानाच्या सोळा घटकांवर आधारित होतं. यामध्ये अरबी समुद्र आणि अटलांटिक महासागर यांच्या पृष्ठभागाचं तापमान, युरेशियामध्ये होणारी बर्फवृष्टी, युरोपातलं तापमान असे वेगवेगळे घटक विचारात घेतले गेले. प्रशांत महासागरात घडणाऱ्या ‘एल निनो’ परिणामाचा प्रभाव भारतातल्या पावसावर होतो, हे पहिल्यांदा या प्रारूपामध्ये लक्षात घेतलं गेलं. विशिष्ट महिन्यांमध्ये या सोळा घटकांच्या नोंदी घेऊन त्यावरून भारतातल्या मोसमी पावसाचा अंदाज बांधला जात असे.

१९८८ ते २००१ अशी तेरा र्वष ‘गोवारीकर प्रारूप’ वापरून पावसाचा अंदाज दिला गेला आणि हा अंदाज अचूक ठरला. पण, २००२ साली पडलेला दुष्काळ ओळखण्यात सोळा घटकांच्या प्रारूपाला अपयश आलं. त्यामुळे २००३ सालापासून पुन्हा नवं प्रारूप स्वीकारण्यात आलं. पण नंतर विकसित करण्यात आलेल्या प्रारूपांमध्येदेखील गोवारीकरांनी विकसित केलेल्या प्रारूपाचा आधार घेण्यात आला होता, हे महत्त्वाचं!

हेमंत लागवणकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

मानविनी भवाई : सर्वश्रेष्ठ साहित्यकृती

१९४७ मध्ये प्रसिद्ध झालेली पन्नालाल पटेल यांची गुजराती कादंबरी ‘मानविनी भवाई’ ही सर्वश्रेष्ठ साहित्यकृती आहे. एकूण २८० पानांची ही कादंबरी असून, तिची ३५ प्रकरणे आहेत. ही कादंबरी म्हणजे काळू आणि राजू यांची प्रेमकथा आहे. पण रूढार्थाने वळणारी ही प्रेमकथा नाही. या कादंबरीचा मुख्य विषय १९००-१९०१ या वर्षी पडलेला भयंकर दुष्काळ हा आहे. अफाट अशा काळाच्या पडद्यावर चाललेली, वेगवेगळ्या प्रेरणांनी खेळणारी असंख्य पात्रे यात भेटतात. माणसांची अगतिकता, जगण्यासाठी चाललेली धडपड, भुकेमुळे माणुसकी विसरणारा माणूस प्रसंगी नरभक्षक कसा होतो इ. चे वास्तव व कलात्मक दर्शन या भवाईत (नाटकात) आहे. शेतीच्या वेगवेगळ्या हंगामाचे हुबेहूब केलेले वर्णन या कादंबरीत जागोजागी आढळते.

काळू- राजूची ही गोष्ट फक्त गुजरातमध्ये पडलेल्या भीषण दुष्काळाची राहत नाही तर ती बंगाल, बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश इ. हिंदुस्थानवर पडलेल्या त्या वेळच्या दुष्काळाचे प्रतिबिंब ठरते. दुष्काळग्रस्त असा हा संपूर्ण समाज काळाशी कशी झुंज घेतो, त्याच्यापुढे कसा नमतो, हे परिणामकारकरीत्या या कादंबरीत वाचायला मिळते. मग ती केवळ काळू-राजूची गोष्ट राहत नाही. ते एक निमित्तमात्र असतात.

‘भवाई’ हा प्रकार गुजराती लोकनाटय़ाचा एक प्रकार असून त्याला साडेतीनशे वर्षांची थोर परंपरा आहे. गुजरातमधील शेतकरी आपल्या व्यवसायाला ‘मानविनी भवाई’ म्हणजे मानवी आयुष्याचे निसर्गाच्या तालावरील नाटय़ असे म्हणतात. आशा- निराशा, मानवी नातेसंबंध इ. चित्रण करणारी भयंकर दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर उमटलेली एक असफल प्रेमकथा म्हणजे ही कादंबरी आहे. पण केवळ प्रेमकथा सांगणे इतका सीमित उद्देश या कादंबरीचा नाही तर त्यात इतर अनेक मोठय़ा समस्यांचे, लोकांच्या संघर्षांचे चित्रण केले आहे. नियतीच्या प्रतिकूलतेविरुद्ध लढणाऱ्या नायकाचं- काळूचं चित्रण विलक्षण प्रत्ययकारी आहे. ‘मानविनी भवाई’चा शेवट धक्कादायक आहे. त्या काळात विवाद्य ठरलेला आहे.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com