26 March 2017

News Flash

कुतूहल : सूरपाल कोण होता? (पूर्वार्ध)

प्राचीन भारतीय शेतीविषयक ग्रंथांमध्ये ‘बृहत्संहिता’, ‘शारंगधरपद्धती’ आणि ‘वृक्षायुर्वेद’ यांचे संदर्भ सापडतात. वराहमिहिरलिखित ‘बृहत्संहिता’ आणि

[email protected] | Updated: January 14, 2013 12:17 PM

प्राचीन भारतीय शेतीविषयक ग्रंथांमध्ये ‘बृहत्संहिता’, ‘शारंगधरपद्धती’ आणि ‘वृक्षायुर्वेद’ यांचे संदर्भ सापडतात. वराहमिहिरलिखित ‘बृहत्संहिता’ आणि शारंगधरलिखित ‘शारंगधरपद्धती’ या ग्रंथांमध्ये अनेक प्रकरणांपकी एक प्रकरण म्हणून शेती विषय येतो. फक्त ‘वृक्षायुर्वेद’ हा ग्रंथ पूर्णपणे शेती विषयाला वाहिलेला आहे. या ‘वृक्षायुर्वेद’ ग्रंथाचे लेखन सूरपाल याने केले आहे.
सूरपाल हा ११व्या शतकातील राजा भीमपाल याच्या दरबारातील एक विख्यात वैद्य होता, असा उल्लेख मिळतो. ‘वृक्षायुर्वेद’ ग्रंथात ३२५ संस्कृत श्लोकांद्वारे शेतीविषयक विविध माहिती व मार्गदर्शन दिलेले आहे. यातील बरेसचे श्लोक इतर दोन ग्रंथांमध्येही आढळतात. शारंगधर हा १४ व्या शतकात होऊन गेला. त्यामुळे ‘शारंगधरपद्धती’तील उपवनविनोद हा भाग सूरपालाच्या ‘वृक्षायुर्वेद’ ग्रंथातून घेतलेला असावा, असे म्हणण्यास वाव आहे.
सूरपालाने वनस्पतींचे शरीरशास्त्र हे मानवाच्या शरीरशास्त्राप्रमाणेच मानले आहे. त्यामुळे आयुर्वेदप्रमाणे वनस्पतींच्या आरोग्याशी संबंधित असे ‘वृक्षायुर्वेद’ असे चपखल नाव सूरपालाने दिले. ग्रंथात १७० विविध वनस्पतींच्या जातींबद्दल माहिती दिलेली आहे.
 ग्रंथ दहा उपशीर्षकांमध्ये विभागलेला आहे. आपण या ग्रंथात स्वत:चे वेगळे काही सांगितलेले नाही, तर पूर्वीच्या ऋषीमुनींनी लिहून ठेवलेलेच सुसूत्रपणे विशद करत आहोत, असे सूरपालाने सुरुवातीलाच म्हटले आहे. झाडाचे महत्त्व या उपशीर्षकांतर्गत सूरपालाने ज्याच्याखाली लोकांना विश्रांती घेता येते असे एक झाड जंगलातील अनेक झाडांपेक्षा अधिक चांगले, असे सांगून प्रत्येकाने वृक्षारोपण करावे असे सुचवले आहे.
सूरपाल जमिनीचे वर्गीकरण कोरडी, दलदलीची व सर्वसाधारण अशी करतो. कोणत्या जमिनीत कोणती झाडे चांगली वाढतात, हे त्याने विस्ताराने सांगितले आहे. वनस्पती (ज्यांना फुले न येता फळे येतात), द्रुम (ज्यांना फुले येऊन मग फळे येतात), लता (वेली), गुल्म (झुडूप) असे झाडाचे चार प्रकार त्याने केले आहेत. झाडांच्या बिया, देठ व गड्डय़ापासून पेरणी करावी आणि कोणती झाडे बियांपासून, कोणती देठापासून व कोणती गड्डय़ापासून वाढतात, याचीही माहिती त्याने दिली आहे.
प्रतिनिधी मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई-२२ [email protected]

जे देखे रवी.. : १२.  पुणे : हिराबाग आणि एस. एम. (अण्णा) जोशी
वडील इंग्लंडहून परत आल्यावर आमचे बिऱ्हाड टिळक रस्त्याच्या त्या काळच्या जवळ जवळ टोकाला पुण्यातल्या माडीवाले कॉलनीत होते आणि समोर हिराबाग होती. मातीच्या ढिगाऱ्यांनी वेढलेले हे बेट त्या वेळी पाचूच्या बेटासारखे दिसत असे. मैदान बऱ्यापैकी विस्तीर्ण होते आणि सर्व प्रकारची सर्व वयांची मुले तिथे निरनिराळे खेळ खेळत असत. कधी कधी आजूबाजूला तंबू ठोकून क्रिकेटचे सामने होत आणि चौकार हाणला गेला तर मंद टाळ्यांचा गजर होत असे. पुढे इथे मोठे दगडी सिमेंटचे बांधकाम करून स्टेडिअम उभारण्यात आले तेव्हा माझी हिराबाग गुदमरली, असा विचार आला होता. दगडी भव्य बांधकाम करून ऐशआरामात बसून माणसांच्या, जनावरांच्या, गुलामांच्या किंवा भाडोत्री सैनिकांच्या झुंजी लावणे हा उद्योग सर्वप्रथम रोमन लोकांनी सुरू केला तो आता नव्या अवतारात सर्व जगात पसरला आहे. मालक बदलले आणि भाडोत्री सैनिक नावाजले आमि मालक राजेराजवाडय़ांचे पोशाखही बदलले. परवा एक मालक आखूड टी-शर्ट, घरंगळून खाली आलेली जीन पॅन्ट आणि त्यामुळे वर डोकावणारी त्याची आतली चड्डी अशा अवतारात वर्तमानपत्रातल्या पहिल्या पानावर झळकत होता.
त्या काळातले माझ्या मनात कायमचे घर करून राहिलेले एक व्यक्तिमत्त्व म्हणजे एस. एम. जोशी. विसाव्या शतकाच्या पहिल्या ६० वर्षांत वैचारिक व्यक्तिमत्त्वांचे महाराष्ट्रात आणि मुख्यत: पुण्यात उदंड पीक आले. त्या काळातले एस. एम. (अण्णा) हे शेवटचे व्यक्तिमत्त्व. त्यांच्या आधीच्या सगळ्यांचे वैचारिक मंथन धर्माला केंद्र ठेवूनच केले गेले. काही विरोधी विचार मांडत, काही धर्माला धरून वाटचाल करीत, धर्म आणि जात याबद्दल कणभरही अभिनिवेश न बाळगता ज्यांनी मानव धर्म पाळला त्यातले अग्रणी म्हणजे एस. एम. त्यांची बायको तारामावशी माझ्या आईची जिवलग मैत्रीण होती आणि टिळक रोडवरच्या त्यांच्या दीड खोलीच्या घरात आई मला नेत असे. ते पुढारी होते. त्यांचे नाव वर्तमानपत्रात येत असे. मी आईला म्हटले, ‘‘हे पुढारी असून यांचे घर एवढे लहान कसे.’’ ती म्हणाली होती, ‘‘ते अगदी निराळे आहेत.’’ पुढे ज्ञानेश्वरी वाचली तेव्हा ‘हृदयात उमटलेल्या ज्ञानाने। देहात उमटतात चिन्हे।’ या ओवीमुळे त्यांच्या चेहऱ्यावरच्या सात्त्विक तेजाचे रहस्य कळले. हल्लीच्या आपल्या राजकारणी मंडळींना झाले आहे तरी काय? नगरसेवक आपल्या विभागात, आमदार आपल्या तालुक्यात आणि मंत्री आपल्या जिल्ह्य़ात आर्थिक गडबडी करीत संस्थानिक झाल्याचा भास होतो. परवा फरीद झकारियांचे स्वातंत्र्याचे भवितव्य वाचले. त्यात ते लिहितात, ‘‘इंग्लंडमधल्या लोकशाहीच्या जाहीरनाम्याची (मॅग्ना कार्टा) मोठी थोरवी सांगितली जाते; परंतु तेव्हासुद्धा देशाच्या राजाने प्रादेशिक सरदार आणि जमीनदार यांच्यात तह केला एवढेच त्या दस्तावेजाचे महत्त्व होते. जनता दूरच होती.’’
आजही आपल्या देशामध्ये तीच स्थिती आहे.
रविन मायदेव थत्ते[email protected]

आजचे महाराष्ट्रसारस्वत : १४ जानेवारी
१८८२ >  लैंगिक शिक्षण आणि कुटुंबनियोजन वा ‘संततिनियमन’ यांचा प्रसार-प्रचार करणारे महाराष्ट्रातील आद्य विचारवंत, ‘समाजस्वास्थ्य’कार रघुनाथ धांेडो कर्वे यांचा जन्म. स्त्रीमुक्तीच्या विचारात महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुढले पाऊल त्यांच्या या सुपुत्राने टाकले. त्यासाठी समाजाचा विरोध पत्करला. पत्नी मालतीबाई यांची साथ मात्र त्यांना लाभली. ‘समाजस्वास्थ्य’ हे मासिक या दाम्पत्याने जुलै १९२७ ते नोव्हेंबर १९५३ अशी २७ वर्षे चालविले. र. धों. यांचे निधन १९५३च्या ऑक्टोबरात झाल्यानंतर हे मासिक बंद पडले, परंतु त्यांचे विचार आता ग्रंथरूपाने प्रकाशित झाले आहेत.
१९०१ > विनायक सदाशिव गोगटे यांचा जन्म. ‘नीतिशास्त्रविचार’ हा त्यांच्या हयातीत त्यांनी सिद्ध केलेला महत्त्वाचा ग्रंथ. त्याखेरीज ललित लिखाणही त्यांनी केले, परंतु तत्त्वज्ञान आणि नीतिशास्त्र यांच्या अभ्यासात ते रमले.
१९३१ >  राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे दिवंगत अभ्यासक, प्राचार्य ना. य. डोळे यांचा जन्म. ‘राजकीय विचारांचा इतिहास’ हा संदर्भग्रंथ त्यांनी लिहिला, तसेच काश्मीर प्रश्न, शेजारी देशांशी भारताचे संबंध यांबाबत माहिती देतानाच नेमस्त भूमिकाही घेणारी पुस्तके लिहिली. उदगीरच्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनचे प्राचार्य म्हणून त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले.

वॉर अँड पीस : आम्लपित्त- अ‍ॅसिडिटी
आयुर्वेदातील मूळ संहिताग्रंथातील चरक व वाग्भट संहितात आम्लपित्त ही स्वतंत्र व्याधी सांगितलेली नाही. आयुर्वेदाच्या अभ्यासकांनी यावर चिंतन करून, अधिक प्रकाश टाकावा असे वाटते. आम्लपित्ताची यशस्वी चिकित्सा करताना मला गणिताची मोठी मदत होते असे सांगितले तर आमच्या वैद्य, शास्त्री, पंडितांचा व मोठमोठय़ा डॉक्टर मंडळींचा विश्वास बसणार नाही. वात-पित्त-कफ यांचा नेहमी त्रिकोणात्मक विचार डोळ्यासमोर ठेवला, तर आयुर्वेदीय उपचार चुकत नाहीत. प्रत्येक विकारात एका टोकाला जाऊन रोगाचा विचार करून चालत नाही. ‘आम्लपित्त’ हा विकार असला, तरी त्याला त्रिकोणाच्या अजून दोन बाजू – वात व कफ आहेत हे सर्वानी लक्षात घ्यावयास हवे. आम्लपित्त हे नेहमीच केवळ पित्तप्रधान असतेच असे नाही. त्याला कफाची झालर किंवा वायूची लहरही असू शकते.
आयुर्वेदाला तर्कशास्त्र आधार आहे, तर्काचा आधार गणित आहे. ज्या गणितामुळे आयुर्वेद मला सहज समजतो, लीलया वापरता येतो त्या गणिती शास्त्राला; गणिती नव्हे – मोजके नव्हे – तर भरभरून अभिवादन!
आम्लपित्त हा विकार म्हणून आपल्या शरीरात घर करायच्या अगोदर त्याची चाहूल लागलेली असते. छातीत जळजळ, पोटात गॅस धरणे, पोट फुगणे, तोंडाला पाणी सुटणे, क्वचित पोट दुखणे, पोट साफ नसणे, मलावरोध, डोकेदुखी, उलटीची भावना, दात आंबणे या छोटय़ा छोटय़ा तक्रारींकडे दुर्लक्ष केले, की आम्लपित्त विकाराचा शिक्का पक्का बसतो.
शहरी जीवनातील राहणीमुळे बऱ्याच लोकांना होणारा हा विकार आहे. जेव्हा भूक असते, तेव्हा जेवायचे नाही व जेव्हा भूक नसेल तेव्हा अवाजवी व पुन:पुन्हा खावयाचे. यामुळे आम्लपित्त विकार बळावेल यात नवल ते काय? पित्ताला म्हणजेच अग्नीला वेळच्या वेळी काम दिले नाही म्हणजे त्याचा उपद्रव ‘अ‍ॅसिडिटी’च्या रूपाने होतो. हा विकार बऱ्याच वेळा ‘अल्सर’ विकाराची पहिली पायरी असते. मोठमोठय़ा कंपन्यांचे डायरेक्टर, उद्योगपती, सतत कामात असणारे समाजसेवक यांना आपल्या आरोग्याकडे बघावयास ‘वेळ नाही’ अशी स्थिती असते. त्यांच्यात मोठय़ा प्रमाणावर आढळून येणारा हा खात्रीचा विकार असतो.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

First Published on January 14, 2013 12:17 pm

Web Title: who was surpal