लोकरंग (२६ जून) च्या ‘गॅलिलिओ : एक कवी’ या माझ्या लेखात अनवधानाने ज्या द्रवांचं pH मूल्य सातपेक्षा जास्त असतं त्यास आम्ल म्हणतात, तर सातपेक्षा कमी असतं त्यास अल्कली असं म्हटलं जातं, असं प्रसिद्ध झालं आहे. त्याऐवजी pH मूल्य सातपेक्षा जास्त असतं त्यास अल्कली असं म्हटलं जातं, असं लिहायला हवं होतं. या चुकीबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.
– निरंजन घाटे

सिनेमा बनवायला प्रगल्भ हात हवेत!
‘बंदी- आघात, प्रघात, विघात’ हा अमोल पालेकर यांचा लेख (१९ जून ) सेन्सॉरच्या एकूण कारभारावर चांगला प्रकाश टाकतो. कोणत्याही कलाकृतीवर बंदी असता कामा नये, ही अपेक्षा नैसर्गिक आणि न्याय्य आहेच. पण हे अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य देताना ते इतरांच्या अभिव्यक्तीचा संकोच करणारे असू नये.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबतीत सिनेमाला सापत्न वागणूक मिळते असा लेखाचा सूर आहे. त्याचे कारण सरळ आहे की, सिनेमाचे प्रदर्शन हे सार्वजनिक असते. बहुविध प्रकारचा समूह, झुंड सिनेमा पाहत असते. त्यामुळे टीव्ही, पुस्तक आणि सिनेमा यांची तुलना होऊच शकत नाही. आणखी एक मुद्दा म्हणजे, ‘कलाकृती’ या शब्दाचा उल्लेख लेखात वारंवार झाला आहे. याचा अर्थ असा घ्यायचा का, की कोणाही व्यक्तीने पैसे आहेत म्हणून सिनेमा काढला तर ती कलाकृती होते?
मुळात सिनेमा दिग्दर्शित करणारा सर्वार्थाने हे mass medium हाताळण्यात तरबेज असावा आणि म्हणून तो प्रशिक्षित असला पाहिजे असे प्रकर्षांने वाटते. आपण या शक्तिशाली आणि जनमानसावर तीव्र परिणाम करणाऱ्या माध्यमाच्या निर्मिती-दिग्दर्शनासाठी काहीच अर्हता, नियम ठरवलेले नाहीत. कोणीही उठतो आणि सिनेमा काढतो हे थांबवता येईल का, याचा विचार व्हावा. प्रशिक्षित दिग्दर्शक हा केवळ तांत्रिक अंगाचे ज्ञान मिळवत नाही तर तो समाज, नातेसंबंध हाताळण्याविषयीही शिकत असतो. सूचक दृश्यातून, प्रसंगांतून अतिरेकी न होता आपले म्हणणे दिग्दर्शकाला मांडता आले पाहिजे आणि अशा प्रगल्भ हातात सिनेमा असल्यास असे प्रश्न कमी प्रमाणात उद उद्भवतील.
शुभा परांजपे, पुणे</strong>