‘लोकरंग’च्या ११ सप्टेंबरच्या अंकातील ‘राजकीय चष्म्यातून संघाकडे पाहू नका’ हा डॉ. शरद कुंटे यांचा ‘कशात काय, फाटक्यात पाय’ धर्तीचा लेख वाचनात आला. संघाने काय राजकारण केलं नाही? वा राजकीय पक्ष काढले नाहीत? हिंदूंचे प्रतिनिधित्व करण्याकरिता जन्माला आलेल्या संघाला हिंदूंनी आपल्या रक्त- अश्रू- श्रम धनाने वाढविले ते आपल्या अस्तित्वाला कधीही धोका निर्माण होऊ नये म्हणून! स्वा. सावरकरांच्या ‘हिंदुत्व’ ग्रंथापासून स्फूर्ती घेतलेल्या हेडगेवारांनी नंतर सावरकरांच्या ‘माझी जन्मठेप’ला क्रांतिकारी ठरवून स्वयंसेवकांना वाचण्यास बंदी केली. (संदर्भ- ‘तीन सरसंघचालक’- डॉ. वि. रा. करंदीकर) हिंदू सभेला नाकारले. पुढे गोळवलकर संघचालक झाल्यावर तर त्यांनी सावरकरांना ‘बाटगे हिंदू’ (आधुनिक विचारांपायी) आणि इंग्रजांचे रिक्रूटवीर ठरवले. सावरकर म्हणत, ‘आज इंग्रज शस्त्रे देताहेत ती घ्या. उद्या ती कशी, कुणावर वळवायची ते नंतर पाहू.’ सावरकरांच्या या पवित्र्याने सैन्यातील हिंदूंचे प्रमाण शेकडा २५ वरून ७५ पर्यंत आले. याचा फाळणीप्रसंगी देशाला निश्चितच उपयोग झाला. यावरून गोळवलकरांचे आकलन स्पष्ट होते. फाळणीविरोधी लढय़ात संघाने सावरकरांना, हिंदू सभेला पाठिंबा न देता गांधी- नेहरू- पटेलांच्या काँग्रेसला दिला. हे राजकारण नव्हे? पुढे फाळणीनंतर हिंदू सभेला व सावरकरांना संघाने जातीयवादी, मुस्लीमविरोधी ठरवण्यासही मागेपुढे पाहिले नाही आणि ‘आता फाळणी तर झालीय; हिंदू सभा विसर्जित करा’ असा सल्ला गोळवलकर सावरकरांना देऊ (न मागता) लागले. गोळवलकरांचा हिंदुत्व, हिंदू राष्ट्रवादावर विश्वास नव्हता. म्हणूनच डॉ. मुखर्जीना हिंदू सभेपासून फोडून निधर्मी इसाई- इस्लामींचा अनुनय, उदात्तीकरण करणारा जनसंघ जन्माला घातला. पुढे हिंदूंचे भारतीयीकरण करण्याकरिता भाजस तर काढलाच होता. अभाविप, भामसं, भाविप, भाकिस यांसारख्या संघटनाही काढल्या. वर हिंदुत्वाचे ढोंगही करत राहिले. गांधीवादी- समाजवादी भाजप जन्माला घातल्यावर संघाचे हिंदुत्वाचे ढोंग बंद झाले, पण टीकाकार संघाला हिंदुत्ववादी ठरवत राहिले, एवढाच संघाचा हिंदुत्ववाद! एवढे करूनही संघावर इसाई- इस्लामी तर सोडा; कोणताच पक्ष विश्वास ठेवतच नाही.अशा संघाच्या कार्याबद्दल विचारले जाताच त्यांच्यावर संघाचे ६५ देशांतील कार्य, ५४ देशव्यापी संघटना, पावणेदोन लाख सेवाकार्याचा मारा केला जातो. फाळणीनंतरचे संघाचे मुख्य उद्दिष्ट असलेले समान नागरी कायदा, ३७० कलम रद्द करणे, घुसखोर हटाव, राममंदिर आदी लढे एक तर अर्धवटच लढवले वा स्वत:च पराभूत करून टाकले. ‘स्वदेशी’ हेदेखील संघाचे एक ढोंगच! गोव्याच्या भाषिक आंदोलनात संघ- भाजप नेते उघडपणे सामील होते. सत्ता येताच आपण दिलेल्या शब्दांना हरताळ फासणे हा संघ- भाजप नेत्यांचा स्थायिभावच आहे, जे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत आज करत आहेत. इंग्रजी शाळांचे अनुदान बंद करणार नसाल तर किमान मराठी/ कोंकणी शाळांना पुरेसे अनुदान देण्यास कुणाची आडकाठी होती? संघाच्या लोकांची मुलेही मिशनरी शाळेतच शिकतात; तर मग हा आंदोलनाचा पवित्रा काय हिंदूंना फसविण्यासाठीच संघ- भाजप नेत्यांनी हाती घेतला होता? पर्रिकरांच्या म्हणण्यानुसार जर आधीच्या शासनाचा निर्णय आज भाजप शासनालाही बंधनकारक असेल, तर मग तुम्ही आंदोलन केलेच कशाला, याचे उत्तर पर्रिकर- पार्सेकर देतील का? संघ- भाजप नेत्यांना हिंदूंना- स्वयंसेवकांना बळीचे बकरे करण्याची/ ठरवण्याची सवय झालेली आहे. हे सारे वेलिंगकरांसारख्यांना तसेच स्वयंसेवकांना निश्चितपणे असह्य़ झाले असणार. आजवर सत्ता नसल्याने संघ- भाजप नेत्यांचा दुटप्पी अहंकारी स्वभाव खपून गेला. आता सत्ता आल्यावरही दिलेला शब्द न पाळणे यापुढे खपणार नाही, हे समजून घेण्यास अजून संघ- भाजपचे नेते तयार नाहीत, ही एक शोकांतिकाच! संघ- भाजप तुटावा, फुटावा, असे कुणीही म्हणत नाही; पण निदान आजवरच्या चुका तरी दुरुस्त केल्या जाव्यात, ही हिंदूंची, देशाची अपेक्षा चुकीची ठरू नये. गांधीजींप्रमाणेच इसाई- इस्लामींचा अनुनय, गोळवलकरांचे चातुर्वण्र्यवादी धोरण, अटल- अडवाणींचा पाकिस्तान अनुनय, देवरसांचे नमाजपढू धोरण यापायी हिंदूंचा सत्यानाश झाला. असा संघ कोणत्या श्रेणीत मोडतो ते संघाच्या ज्येष्ठ-श्रेष्ठांनीच आता सांगावयास हवे. याच अंकातील ‘रा. स्व. संघातील अभूतपूर्व  (?) बंडाळी’ या संजीव केळकर यांच्या लेखात ते वेलिंगकरांना एका बाजूने बंड करणारेही ठरवितात, तर दुसऱ्या बाजूने महत्त्वाकांक्षी! आणि महत्त्वाकांक्षा योग्यही ठरवितात आणि चूकही!  एका बाजूने वेलिंगकरांवर टीकाही आहे. दुसऱ्या बाजूने संघनेत्यांवर ताशेरेही. म्हणजे आपल्याला नेमके काय सांगायचे आहे, लेखकालाच स्पष्ट नाही! संघ- भाजपने त्यांचे आजवरचे धोरण आपण सांगू तेच धोरण आणि तेच तोरण असेच राहिले आहे. फुटीच्या भयाने आजवर संघ- भाजप नेत्यांचे धोरण खपून गेले. आता सत्ता आल्यावरही संघ- भाजप नेते आपला शब्द पाळत नाहीत हे स्वयंसेवकांनाही असह्य़ झालेले आहे. या नेत्यांना असे वाटते की, हिंदू सभा- सावरकर- मधोक यांसारख्यांना आम्ही संपवले आहे, तिथे वेलिंगकरांचा काय पाड? पण संघ- भाजप नेत्यांनी सतत चालविलेली ही फसवणूक आता खपण्याच्या पलीकडे जाऊन पोहोचली आहे, हे स्वयंसेवकांना आणि देशालाही दिसत आहे. बाळासाहेब देवरस आणि त्यांच्या कुशपथकाची हेडगेवारांबरोबर सशस्त्र क्रांती-उठाव यावर सात दिवस-रात्र चर्चेची थाप लेखक कशाला मारताहेत? सावरकर- हिंदू सभेला हेडगेवारांनी कधीच नाकारलेले होते. तेच काम कारण न देता देवरस ते भागवत साऱ्यांनीच चालवलेले नाही का? वेलिंगकर- गोव्याच्या निमित्ताने संघ- भाजपची र्सवकष वैचारिक तपासणी होत असेल तर ते सर्वाच्याच हिताचे आहे. संघ- भाजप नेत्यांना चाणक्य मान्य आहेतच!

– सूर्यकांत शानभाग, बेळगाव