01gauriइटलीमधले सिसिली हे पाहायलाच हवे असे बेट. प्राचीन राजवाडा, थिएटर, कॅथड्रिलसारख्या वास्तू, रमणीय समुद्रकिनारा, वेगवेगळी चविष्ट फळफळावळ यामुळे सिसिलीची ट्रीप अविस्मरणीय ठरते.

इटली म्हटले की आपल्याला पिझ्झा, कॅनलोनी, पास्ता या गोष्टी डोळ्यासमोर येतात. पण इटली म्हणजे एवढेच नाही, तर त्या पलीकडेही देशात बघण्यासारखे बरेच आहे. त्यात भरपूर वायनरीज्, ऑलीव्ह गार्डन्स्, विशाल, संपन्न समुद्रकिनारा व त्यातलेच सिसिली हे बेट या गोष्टी तर आवर्जून बघायलाच हव्यात अशा. इटली देशाच्या वायव्य दिशेचे आयोनिअन समुद्रातले बेटही पाहण्यासारखे. रोम, इटली या देशांत फार पूर्वीपासूनच ख्रिश्चन धर्माचे प्राबल्य होते. त्यामुळे या देशांत चर्चेसना तोटा नाही. हे बेट तसे अरब देश, टर्कस, उत्तर आफ्रिकन् देशांना  जवळचे तसेच नॉर्वेचे समुद्री चाचे व्हायकिंग म्हणजेच नॉर्मनस् यांच्यासाठीचे सुद्धा सोयीचे. इथे धनधान्याची सुबत्ता असल्यामुळे साहजिकच इतर देशांचे व्यापारी लोक येथे येत राहिले. आपण एखाद्या ठिकाणी पर्यटनाला जातो तेव्हा सगळ्याच गोष्टी आपण जाऊन बघू शकत नाही हे तर ओघानेच आले.  त्यामुळे हॉप ऑन हॉप ऑफ बसचा पर्याय उत्तम ठरतो. ज्या गोष्टी आपल्याला भावतात त्या आपण उतरून पाहू शकतो.

impact of us foreign policy on semiconductor industry
चिप-चरित्र : चिप उद्योगाचे ‘पूर्व’रंग
survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
tigress archi video marathi news, loksatta tiger video marathi news
VIDEO: आर्चीच्या बछड्यांची ‘मस्ती की पाठशाला’, टिपेश्वरच्या जंगलातील दंगामस्ती कॅमेऱ्यात कैद
Martand Sun Temple
काश्मीरमधल्या मार्तंड सूर्य मंदिराचा होणार जिर्णोद्धार, अयोध्येतील राम मंदिराशी आहे थेट कनेक्शन

सिसिली बेटाचा किनारा पायी फिरण्यासाठी उत्तम. सिसिलीच्या पश्चिमेला असलेला किनारा रमणीय आहे. तिथून दिसणारा देखावा खरच छानच आहे. पुरातन काळी हा सगळा परिसर अधिकच उठावदार असणार त्याबाबत शंकाच नाही. ग्रीक भाषेत पॅनोरामा म्हणजे पॅनोर्मास्, पण पुढे अपभ्रंश होऊन त्याचे पालेर्मो असे झाले. सिसिली पर्यटनासाठी येणाऱ्या आयलंड हॉपिंगच्या क्रूझ शिप्स येथेच येतात.  विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यावर अरब- ख्रिश्चन कलाकृतीचे फ्युजन आपल्याला पाहायला मिळते. उबदार हवामानात समुद्र सफारीची मजा घेण्यासाठी यॉटस् इतक्या आहेत, की किनाऱ्याचा एक कोपरा त्यांच्याच गर्दीने भरलेला आहे. ख्रिश्चन धर्मानंतर अरब, टर्कीचे बायझांटियनस्, नॉर्मनस् व्यापारासाठी आले असले तरी हळूहळू ते आपले बस्तान बसवू लागले. त्यामुळे चर्चेसचे रूपांतर मशिदीमध्ये झाले, त्यामुळे इथे वेगवेगळया संस्कृतीचा मिलाफ पाहायला मिळतो. इटालीअन भाषेत थिएटर म्हणजे टिएट्रो. पियाझा म्हणजे नगरचौक, तर पलाझो म्हणजे राजवाडा. बेसिलिका म्हणजे प्रार्थनास्थळ, कथ्रिडल किंवा कॅतेड्रा म्हणजे पोपचे निवासस्थान.

शहराच्या मध्यभागी असलेले टिएट्रो मॉसिमो हे युरोपमधल्या पॅरिस, व्हिएन्नानंतरचे तिसऱ्या क्रमांकाचे ऑपेरा हाऊस आहे. हे तीन हजार प्रेक्षक मावतील असे भव्य थिएटर बांधायलाच २५ वर्षांचा कालावधी लागला. वास्तूच इतकी भव्य त्यामुळे  प्रवेशसुद्धा भारदस्तच. शाही पायऱ्या चढून आल्यावर ब्राँझ धातूने बनवलेल्या सिंहावर दोन रोमन युवती स्वागतासाठी बसल्या आहेत. स्थापत्यकार बेसिली याने अ‍ॅग्रीजेंटो येथील ग्रीक टेंपलप्रमाणे सहा कोरींथीन खांबांनी गॅलरी केली आहे. आत प्रवेश केल्यावर आत वेगवेगळया उंचींवर बसण्याची व्यवस्था आहे, तळाला ऑर्केस्ट्राचा ग्रुप असतो. वरचे छत आवाजाचा प्रभाव जाणवण्यासाठी स्टील खांबांनी फिरते ठेवले आहे. १९९७ मध्ये या थिएटरची शंभरी साजरी झाली. लोकप्रिय चित्रपट गॉड फादर-थ्री मधील काही दृश्ये इथे चित्रित केली गेली आहेत.

पालेर्मो कथ्रिडल हे बाराव्या शतकात नॉमन काळात बांधलेले आधीच्या मशिदीवर उभारलेले चर्च. सुरुवातीला ही अगदी छोटी वास्तू होती, पण पुढे तेरा व चौदाव्या शतकात बाहेरील बाजूला गॉथिक स्टाइलवर कोरीव काम केलेले प्रवेशद्वार, दोन मोठे टॉवर्स उभारले गेले आहेत. मशिदी जवळच नॉर्मन काळातील कमान आहे. प्रवेशद्वारावर बाळासहित मडोना स्टॅचू आहे. आतमध्ये संगमरवरावर हिरव्या रंगाच्या दगडाने नक्षीकाम केलेले आहे. भिंतींवर निळया मोझेक रंगाची चित्रे आहेत. जमिनीची फरशी संगमरवरी असून त्यावर छतावरील एका झरोक्यातून सूर्यकिरण पडतात आणि त्यानुसार दिवसाची वेळ अचूक दाखवली जाते. त्या रेषेवर बारा राशींची चित्रे असून त्यातून मोसम बरोबर वर्तवला जातो. मध्यान्ही सूर्यकिरण मधोमध उत्तर दक्षिण दिशेत पडतात. खरंतर, बाजूच्या मॉनरिआल या शहरातल्या चर्चच्या तोडीचे चर्च बांधण्याच्या विचाराने त्या काळच्या बिशपने याची उभारणी केली होती. पण तरीही ते तुलनेत जरा कमीच पडले. तरीही आतील भव्य कमानी, कोरींथीन खांब व नक्षीकाम केलेल्या टाइल्स व जमीन मात्र अप्रतिम आहे.

क्वात्रो कांती, हे दोन मुख्य रस्ते, व्हिया मकीडा व व्हिटारिओ इमॅनुएल छेदून झालेल्या चौकाचे नाव. तिथल्या कोनात चार मजली, किंचित कोनाकृती चार इमारती बांधल्यामुळे हा चौक अष्टकोनी झाला आहे. पहिल्या दोन मजल्यांपर्यंतच्या कोनात कारंजे, तिसऱ्या मजल्यावर सिसिलीच्या चार राजांचे पुतळे, तर चौथ्या मजल्याच्या कोनात चार रोमन देवतांचे पुतळे आहेत. त्या काळातील युरोपातल्या टाऊन प्लानिंगचे हे पहिलेच उदाहरण आहे.

प्रत्येक विभागात नवा आणि जुना असे दोन विभाग असतात. जुन्या भागात राजवाडय़ाजवळ राजा विल्यम दुसरा याच्या स्वागतार्ह उभारलेली कथ्रिडल आहे. त्याच्या जवळच प्रिटोरिआ पियाझा स्क्वेअरमध्ये कारंजा तर आहेच शिवाय त्याच्या सभोवार ग्रीक स्त्री-पुरुषांचे अतिशय सुंदर पुतळे आहेत. हे अत्यंत कलात्मक पुतळे नग्न असूनही अश्लील वाटत नाहीत. शेजारीच सांता कॅतरिना चर्च आहे. त्या चर्चच्या समोर वाद्यं वाजत असतात. लोक हातातले सामान मध्ये ठेवून त्या तालावर  रिंगण करून नाचतात. इथे एका वेळी असे पाच सहा ग्रुपस् नाचत असतात. पूर्वीच्या नन्सच्या क्वार्टसचे युनिव्हर्सिटीत रूपांतर झाले आहे. आपल्याकडसारखा चोर बझार इथेही आहेच. अगदी क्षुल्लक गोष्टींपासून ते घरगुती वापराचे सामान, शोभेच्या वस्तू, कपडे वगैरे अनेक गोष्टी रस्त्यावर मांडलेल्या असतात. जुन्या भागात रस्ते अरुंद असल्याने या भागात फिरताना बस ड्रायव्हरचे कौशल्य पणाला लागते.

मॉनरिआल हे कपितो डोंगर उतारावरील गाव. पूर्वी पालेर्मो जवळजवळ तीनशे वर्षे अरबांकडे होते. त्या काळात त्यांनी चर्चेसची प्रार्थनास्थळं बनवली. काही भाग तोडून मिनार बनवले. हे करताना बांधकामातील बायझांटिन कौशल्यही आले आहे. अकराव्या-बाराव्या शतकात नॉर्मन राजांनी आपल्या इस्टेटी परत घेतल्या. अरबांनी आपल्या कारकीर्दीत येथे ऑरेंज, ऑलिव्ह, बदामाची लागवड केली. या फळांच्या मोसमात ती दरी अक्षरश: पिवळी धम्मक दिसते. त्याला गोल्डन शेल्फ असे म्हणतात. या फळांची युरोपात सर्वात प्रथम येथे ही लागवड केली गेली असे आम्हाला सांगितले गेले. आम्ही तेथे ऐन मोसमात पोहोचल्यामुळे ती दरी खरेच सोनेरी भासत होती. मॉनरिआल हे अगदी लहान मामुली गाव होते पण इथले जंगल ही नॉर्मन राजांची शिकारीसाठी आवडीची जागा. त्या वेळेपासून गावाचा हळूहळू विस्तार व्हायला लागला. पुढे राजवाडा बांधला गेला. त्याचे आता टाऊन हॉलमध्ये परिवर्तन झाले आहे.

इथे अशी दंतकथा आहे की, एकदा राजा विल्यम शिकारीसाठी गेलेला असताना विश्रांतीसमयी व्हर्जिन मेरीने दृष्टांत देऊन येथे चर्च उभारण्यास सांगितले. बाराव्या शतकात बांधकामास सुरुवात केलेले हे चर्च तेराव्या शतकात पूर्ण झाले. वेळोवेळी बदललेल्या राजवटींमुळे त्याचे वेगवेगळे रूपांतर होत गेले. त्यामुळे ही वास्तू नॉर्मन, बायझांटिन व अरब आर्किटेक्चरचा हा उत्कृष्ट नमुना मानली जाते. चार कोरिंथीन खांबांवर असलेल्या सज्जावर अरब स्टाइलच्या एकमेकांना छेदणाऱ्या कमानी, त्यावर मोझेकचे डिझाइन. आत प्रवेश केल्यावर मात्र सोनेरी चमचमाट. सोनेरी, हिरवा, पांढरा अशा पट्टय़ांनी नटलेला मार्बल. भिंतीवर सोनेरी वर्खावर काचा बसवून तयार केलेले मोझेक आहे. त्यात येशूची जन्मकथा चित्रित केलेली आहे. आल्टरवर सोनेरी रंगाने रंगवलेली सेंट पॉल व सेंट पीटर यांची चित्रे आहेत. एके ठिकाणी राजा विल्यम व्हर्जिन मेरीला हे कथ्रिडल अर्पण करीत असल्याचे दृश्य आहे. त्याकाळी या चर्च बांधणीसाठी पंचवीस टन सोन्याचा वापर करण्यात आला होता.

पालेर्मो येथून जवळच एलमिआने या जमातीने एरिस येथे टेम्पल ऑफ सेजेस्टा बांधलेले आहे. उंच डोंगरावर सकाळच्या कोवळ्या उन्हात देवळाचा दगड सोन्यासारखा चमकतो. हे ग्रीक काळात बांधलेले आहे. इथल्या देवळांना छत नसतेच. ते प्रचंड खांब कसे आणि कुठून आणले असतील याबद्दल आश्चर्य वाटत राहते. ग्रीक किंवा रोमन म्हटले की त्यांचे अ‍ॅम्फी थिएटर असलेच पाहिजे, त्याला सेजेस्टाही अपवाद नाहीच. डोंगर चढताना वेगळीच मक्याच्या कणसासारखी, पण वर ब्रोकोलीसारखी फुलं होती. शिवाय इतर जंगली फुलं होतीच. सकाळच्या प्रसन्न वातावरणात सभोवारचा आसमंत उजळून निघाला होता.

अ‍ॅग्रिजेंटो ही ग्रीक टेम्पल व्हॅली म्हटले जाते. इथे असलेल्या हिप्सा तसंच अक्रगास या दोन नद्या आणि मेडिटरनियन समुद्राला समांतर डोंगर रांगा यांच्यामुळे नैसर्गिक वेस तयार झाली आहे. या सुपीक व सुरक्षित जागी वसाहत वसली नाही तर नवलच. ख्रिस्तपूर्व ५०० वर्षे या ठिकाणी मोठी ग्रीक वसाहत होती. या अकराशे एकरावर जवळजवळ दोन लाखांवर लोक रहात होते असे सांगितले जाते. येथे थोडय़ा उंचावर ग्रीक देवता झुस, हक्र्युलिस, जुनो यांची देवळे आहेत. पूर्वाभिमुख लेसीना देवळाच्या सर्व बाजू खुल्या असून देवाला भेटवस्तू किंवा बळी देण्याचा चौथरा, भक्त गणांना बसण्यास त्यांच्या पदाप्रमाणे आसनं आहेत. थोडे खाली ऑलिव्ह, बदामाची लागवड केलेली आहे. त्यामधून जाताना पाणीपुरवठय़ाची अ‍ॅक्वाडक्ट, त्यावेळेच्या लहान-मोठय़ांच्या कबरी अशी दृश्ये नजरेस पडतात.

इथले हक्र्युलिसचे देऊळ हे इथले सर्वात मोठे देऊळ आहे असे सांगितले जाते. या देवळाला दोन बाजूंना तेरा खांब आहेत, तर समोर आठ खांब आहेत. हे देऊळ सर्व बाजूंनी बंद असून प्रवेशाच्या ठिकाणी  उंच केलेल्या हातावर देवळाचा भार घेतला आहे असे दोन पुतळे आहेत. आतमध्ये वर चढून जायला गोलाकार जिना दिसतो. अठराव्या शतकापर्यंत याचा चर्च म्हणून स्थानिकांकडून वापर केला जात होता. त्यामुळे या वास्तू जरा बऱ्या स्थितीत आहेत. इथून परिसर न्याहाळला तर त्या विशाल क्षेत्राची कल्पना येते. एकीकडे अजूनही उभी असलेली सिटी वॉल दिसते. आता मात्र तिथे लागूनच नव्या इमारती दिसतात. या इलाक्यात आणखी एक वेगळेच कब्रस्तान पाहायला मिळाले. खरेतर कब्रस्तानात लहानलहान कबरी दिसतात, पण इथे एक एक कबर म्हणजे लहानसे घरच. कुणी अलीकडच्याच पुढाऱ्याची कबर म्हणजे लहानसा राजवाडा बांधला आहे.

पियाझा आर्मेरिना ही जागा अत्यंत सुपीक असल्याने पुरातन काळापासूनच लागवडीखाली होती. या ठिकाणची चौथ्या शतकातली अप्रतिम रोमन व्हिला ही कुणी बडय़ा असामीची असली पाहिजे. आवारात नोकरांना राहण्याची व्यवस्था आहे. तीही अगदी हॉटबाथसकट. आतमध्ये पाहुण्यांसाठी वेगळी दालनं, दिवाणखान्यात भिंतींवर प्रसंगानुचित मोझेक डिझाइन्स, आतमध्ये बेसिलिका जमिनीवरील मोझेक डिझाइन्स अफलातून आहेत. बारमध्ये सुरई, बारबाला, एके ठिकाणी स्विमिंग कॉस्च्युम्स घातलेल्या ललना बीच बॉल खेळताना, तर दांडीवरून धरून आणलेली शिकार, त्याबरोबरीनेच जंगलातील प्राणी, झाडं, फुलं अशी विविध ४०/२० फूट अशी मोठमोठाली मोझेक डिझाइन्स आहेत. ती आफ्रिकन कारागीर आणवून करवून घेतलेली आहेत. मालकानंतर या ठिकाणी गुंडाचा वावर होता. त्यांनी थोडीफार तोडमोड केलीच, त्याचबरोबर दरड कोसळल्याने आतल्या भागातील छप्पर, भिंती पडून काही भाग गाडला गेला. एकोणिसाव्या शतकात शेती करताना मोझेकचे तुकडे, खांब वगैरे मिळाले. त्यानुसार उत्खनन करून ६०साली आतल्या भागावर छप्पर बांधले गेले. आतमध्येही खास रोमन बाथची व्यवस्था व त्याकरिता लागणारा मोठा चुलाणा आहे. इथला शाही थाट अफलातून आहे.

सिसिलीच्या कटानिया, मेसिना यांच्या मध्यावर युरोपातील जागृत ज्वालामुखी, माऊंट एटना आहे. याचे भौगोलिक स्थान युरेशिअन प्लेटवर आहे, पण आफ्रिकन व युरेशिअन प्लेटमध्ये सतत हालचाल होत असल्याने हा सदैव जागृत असतो. हा ज्वालामुखी समुद्रसपाटीपासून फक्त२५०० फूट उंचीवर आहे. इतर ज्वालामुखींप्रमाणे त्याचा डोंगरमाथा सपाट नसून कोनाकृती आहे. त्याचे कारण असे की, सततच्या उद्रेकामुळे लाव्हा दूरवर पसरण्याअगोदर वरचेवरच थंड होतो. दिवसभर धूर दिसतच असतो. काही काही ठिकाणी हाच लाव्हा खचून लहान-मोठी विवरं तयार झाली आहेत. त्यामध्ये आपण फिरून येऊ शकतो. पण तिथे लाव्हाबरोबर येणारी वाळू पसरल्यामुळे जरा घसरगुंडी होते, तेव्हा जरा सांभाळूनच चालावे लागते.

इथल्या प्रवासात एक विरोधाभास जाणवला तो म्हणजे १९२८ मध्ये ज्वालामुखीवरच बांधलेल्या हायवेच्या अलीकडे आफ्रिकन प्लेटवरील उजाड ब्लॅकसिटी, तर पलीकडे युरेशिअन प्लेटवर ऑरेंजेस्, ऑलिव्ह, शेतीभाती अशांची हिरवळ आहे. ब्लॅकसिटी म्हणजे या काळ्या कातळावर काहीसुद्धा उगवत नाही. या डोंगरावर सुटीच्या दिवशी चढण्यासाठी हौशी गिर्यारोहक येत असतात. दक्षिणेकडून बसने वर जाताना वाटेत पर्च, चेस्टनट ओक, झाडूसारखी दिसणारी ब्रूम ऑफ मॉर्निग अशी झाडे आहेतच. शिवाय विश्रांतीसाठी रेफ्युज कँप, लहानसे हॉटेल आहे. आमची गाईड सांगत होती की, विवरातून येणाऱ्या धुराच्या दिशेवरून आम्हाला दुसऱ्या दिवशीच्या हवामानाचा अंदाज बांधता येतो.

समुद्रसपाटीपासून २६० मी. उंचीवर आयोनिअन समुद्रासमोर माँत् तारो या डोंगरावर टावरमिना आहे. सोळाव्या- सतराव्या शतकात हे एक फिशिंग व्हिलेज होते. येथील स्थानिकांचा मासेमारीचा व्यवसाय होता. पुढे १९ व्या शतकापासून टावरमिनाचे नशीब पालटले. त्याला कारण जर्मन चित्रकार ओतो गेलेंग. निसर्गदृश्ये शोधत तो इथपर्यंत पोहोचला. येथील निसर्गावर तो भाळून गेला. इतका की तो हिवाळ्यातही तिथेच राहिला. समोर माऊंट एटना, ग्रीक, रोमन प्राचीन अवशेष, डोंगर, समुद्र तसेच उत्कृष्ट हवामान यामुळे तो इतका भारावला गेला की, जे समोर दिसेल त्याची चित्र रेखाटत गेला. आपल्या चित्रांचे प्रदर्शन त्याने जर्मनी व पॅरिसमध्ये भरवले. पण लोकांचे म्हणणे असे पडले की, असे ठिकाण वास्तवात नसणार. गेलेंग आपल्याच मनाने चित्र काढतो. त्याने लोकांना सांगितले की मला जाण्या-येण्याचा व राहण्याचा खर्च देणार असलात तर या ठिकाणी मी आपल्याला घेऊन जाईन. त्यावेळेपासून आजपर्यंत टावरमिना हे युरोपिअन लोकांचे आवडते पर्यटन स्थळ बनले. येथे प्रथम ग्रीक वसाहत होती. त्यांचे टिएट्रो ग्रेको, ग्रीक थिएटर होते, पण त्यावर रोमन काळात त्याच्यावर त्यांच्या धर्तीचे बांधकाम झाले. हे थिएटर उंच कडय़ावर असल्याने रंगमंचाच्या मागील बाजूस असलेल्या भिंतीवरील भगदाडातून अथांग समुद्राचा रम्य देखावा दिसतो. समोरील बाजूच्या भिंतीमुळे ध्वनी परावर्तित होऊन आवाज घुमतो. लोकप्रिय गॉड फादर सिनेमातील खूपशी दृश्ये इथे चित्रित केलेली आहेत.

दुसऱ्या महायुद्धामुळे आलेल्या मंदीमुळे पडेल ते काम करण्यास सुरुवात झाली. त्या वेळी एका तरुणीने शाळेत जाऊन मुलींना शिवणकाम, भरतकाम शिकवण्यास सुरू केले. तिने कापडावर कटवर्क करून लहानलहान शोभेच्या छत्र्या बनवल्या. पर्यटनासाठी युरोपातून आलेल्या धनिक स्त्रियांना त्या फारच आवडल्या. तो तिचा पुढे व्यवसायच बनला. आता तर टावरमिनाच्या दुकानातून कटवर्कच्या छत्र्या प्रामुख्याने दिसतात. तसेच मशीन एम्ब्रॉयडरी करणाऱ्या मुली सुंदर पॅचवर्क करून अ‍ॅप्रन्स बनवतात. मी एका दुकानासमोर ते पाहत असताना त्या मुलीने माझ्या नावाने एम्ब्रॉयडरी केलेला रुमाल दिला.

टावरमिनाचेच जुळं भावंडं, कासलमोला हे असेच डोंगरावरचे ठिकाण. टावरमिनाच्या रक्षणार्थ बांधलेला जुना पडका किल्ला, आवारात तोफा अशा आहेत. इथले सेंट अंतोनिओ हे चर्च भव्य नाही, पण ही कासलमोला येथील पहिली वास्तू. माऊंट एटनाच्या सान्निध्यामुळे येथील रस्ताही लाव्हा दगडांच्या मोझेकने बनलेला आहे. लहानसेच गाव असल्याने रस्ते अरुंद आहेत. घरांसाठीही एटनाचे दगड वापरलेले आहेत. इथली स्पेश्ॉलिटी ही आमंड वाइन. इथे एकतर आपण बसने किंवा पायी चढून येऊ शकतो.

या ठिकाणी आम्हाला लालीलाल ब्लड ऑरंेजेस पाहायला व खावयास मिळाली. हा एक वेगळाच नमुना होता. इटली हे ऑलिव्ह ऑईलसाठी प्रसिद्ध आहेच. पण त्यांच्या वेगवेगळ्या प्रती पाहायला मिळतात. कारण त्यांचे एक्स्ट्रा व्हर्जिन ऑइल हे हिरवट रंगाचे असून ते आपल्याकडे पाहायलाही मिळत नाही. ते पावावर  फार चविष्ट लागते. सिसिली हे बेट असल्याने वेगवेगळे मासे, लहान-मोठी कोलंबी, क्लॅम्स भरपूर मिळतात. वेगवेगळी मासळी घालून केलेला रिसोत्तो चवदार असतो. इटालियन वाइनबरोबर असे जेवण घेण्याची मजा औरच. आपल्याकडे मिळणारे कसाटा आइस्क्रीम हे खरेतर तिथलेच. इटलीमध्ये कसाटा हे आइस्क्रीम नसून ते डेझर्ट आहे. ते स्पाँज केकवर कस्टर्ड, फळे घालून केलेले असते. विविध प्रकारच्या प्रसिद्ध वाइन्स, वेगवेगळी डेझर्टस्, तसेच प्राचीन वैभव पाहायचे असल्यास सिसिलीची भेट झालीच पाहिजे.
गौरी बोरकर – response.lokprabha@expressindia.com