पुणे आणि परिसरात शनिवारपासून कोसळणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत केले असून शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या साठय़ातही वाढ झाली आहे. या पावसाने धरणसाठय़ात साधारण १ टीएमसी वाढ झाली असून पुण्यातील चारही धरणे मिळून १४.११ टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे.
पुणे आणि परिसराला शनिवारपासून पावसाने झोडपून काढले आहे. चोवीस तासांत पुणे जिल्ह्य़ांत सरासरी २५.१२ मिमी पाऊस पडला. रविवारी दुपारनंतर पुणे आणि परिसरातील धरणक्षेत्रातही पाऊस झाला. या अवकाळी पावसाने अनेक भागांमध्ये पाणी भरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक भागांमध्ये पाणी भरले. काही ठिकाणी वाहने वाहून गेल्याच्या घटनाही घडल्या. मात्र, या पावसाने धरणसाठय़ातही वाढ झाली आहे. टेमघर धरणक्षेत्रात गेल्या चोवीस तासांत सर्वाधिक म्हणजे ८४ मिमी पाऊस झाला. खडकवासला धरण क्षेत्रांत ६० मिमी, पानशेत धरणक्षेत्रांत ३५ मिमी आणि वरसगाव धरणक्षेत्रांत ३४ मिमी पाऊस झाला. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांमध्ये मिळून आता १४.११ टीएमसी पाणीसाठा झाला असून हा पाणीसाठा एकूण क्षमतेच्या ४८.४२ टक्के आहे. गेल्यावर्षी या कालावधीत पुण्यातील धरणसाठय़ांत २४ टीएमसी पाणी होते.

धरणांची स्थिती
धरण        २४ तासातील पाऊस    पाणासाठा     (टीएमसीमध्ये)        एकूण क्षमतेच्या तुलनेत टक्केवारी
टेमघर    ८४ मिमी            १.२७                ३४.१७
पानशेत    ३५ मिमी            ७.२५                ६८.१२
वरसगाव    ३४ मिमी            ४.५७                ३५.६२
खडकवासला    ६० मिमी            १.०३                ५१.९९

पुणे जिल्ह्य़ांत चोवीस तासांत पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)
हवेली (पुणे शहर, पिंपरी-चिंचवड) – ३१.८
मुळशी, पौड – ३७.५
भोर – ५.७५
मावळ / वडगाव – ३३.२८
वेल्हा – २५.७५
जुन्नर – ३२.७७