कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या वाचनसंस्कृतीच्या प्रसारासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांतर्गत पुण्यामध्ये ४४ ग्रंथपेटय़ा वितरित झाल्या आहेत. या माध्यमातून पुणेकर आपली वाचनाची भूक भागवू शकतील. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर (३१ मार्च) दौंड येथे शंभर पुस्तकांचा समावेश असलेली एक पेटी वितरित करण्यात येणार आहे. रविवारी (२३ मार्च) ग्रंथ दिन साजरा करताना जीवनातील ग्रंथांचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या उपक्रमाने नवे क्षितिज विस्तारले आहे.
वाचनाची गोडी कमी झाली, सध्या मराठी साहित्य वाचतो कोण असे प्रश्न उपस्थित केले जात असले तरी कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी ‘ग्रंथ तुमच्या दारी’ हा उपक्रम यशस्वीपणे राबविला जात आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी १९९६ मध्ये सुरू केलेल्या ‘पेटी वाचनालय’ या प्रकल्पाने तीन वर्षांनंतर विश्रांती घेतली. एका अपघातातूनच विनायक रानडे या युवकाने पुढे तात्यासाहेबांचा हा उपक्रम ‘ग्रंथ आपल्या दारी’ या अभिनव कल्पनेद्वारे समाजासमोर आणला. केवळ नाशिकमध्येच नाही, तर राज्यभरात सर्वत्र आणि देशभरात एवढेच नव्हे तर, परदेशातही रानडे यांची ही कल्पना मूर्त स्वरूपात साकारली आहे.
विनासायास आणि विनामूल्य वाचकांपर्यंत ग्रंथंसपदा पोहोचविण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमाने आतापर्यंत ४५५ ग्रंथपेटय़ांपर्यंतची मजल गाठली आहे. दहा मिनिटांच्या अंतरावर राहणाऱ्या ३५ वाचकांच्या समूहासाठी कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, विज्ञान, इतिहास, अनुवादित असे विविध वाङ्मय प्रकार असलेल्या शंभर पुस्तकांची एक ग्रंथपेटी दिली जाते. दर चार महिन्यांनी प्रत्येक ठिकाणची ग्रंथपेटी बदलून दुसरी पेटी दिली जाते. यामुळे वाचनासाठी हजारो पुस्तके उपलब्ध होत आहेत. या उपक्रमाचा लाभ घेण्यामध्ये नाशिक अग्रेसर असून तेथे ८५ ग्रंथपेटय़ा वितरित झाल्या आहेत. त्यानंतर ठाण्यामध्ये ५५, तर पुण्यामध्ये ४४ ग्रंथपेटय़ांचे वितरण झाले आहे. पुण्यामध्ये बाणेर, औंध, कोथरूड, कर्वे रस्ता, सिंहगड रस्ता, चिखली, िपपळे गुरव, विमाननगर, शनिवार पेठ आणि करिष्मा सोसायटी अशा भागामध्ये वाचकांच्या अभिजात साहित्य वाचनाची भूक भागवित आहे.
राज्यातील विविध ठिकाणांसह गुजरात, दिल्ली या राज्यांमध्ये ग्रंथपेटय़ा पोहोचल्या असून पुढील महिन्यात कर्नाटकातील बेळगाव येथे एक ग्रंथपेटी सुरू होत आहे. शहीद हेमंत करकरे यांच्या पत्नीने करकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नाशिकरोड कारागृहातील बंदिवानांसाठी एक ग्रंथपेटी देणगी दिली. येरवडा, ठाणे, नागपूर येथील बंदिजनांसाठी त्याचप्रमाणे हरसूल, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ११ आदिवासी पाडय़ांवर ग्रंथपेटीचा लाभ घेणारे वाचक आहेत. महिला आणि अपंग निवासी वसतिगृहांमध्येही ग्रंथपेटी उपक्रम चालविला जात आहे.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Mar 2014 रोजी प्रकाशित
‘ग्रंथ तुमच्या दारी’ अंतर्गत पुण्यामध्ये ४४ ग्रंथपेटय़ा
कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या वाचनसंस्कृतीच्या प्रसारासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांतर्गत पुण्यामध्ये ४४ ग्रंथपेटय़ा वितरित झाल्या आहेत.

First published on: 22-03-2014 at 02:50 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 44 book boxes in pune by kusumagraj pratishthan