पत्रकार राजीव खांडेकर यांना ‘अत्रे पत्रकारिता’ पुरस्कार जाहीर झाला आहे. आपल्या सहज विनोदाचा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री सुप्रिया पाठारे आणि विनोदी लेखक सु. ल. खुटवड यांनाही अत्रे पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेची सासवड शाखा यांच्यातर्फे हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.  
विख्यात साहित्यिक आचार्य अत्रे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या स्मृतिदिनी म्हणजे १३ जून रोजी हे पुरस्कार दिले जातात. या वर्षी सासवड नगरपालिकेच्या अत्रे सभागृहात पुरस्कारांचे वितरण होणार आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते आणि रावसाहेब पवार यांनी ही माहिती दिली. रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि शाल-श्रीफळ असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.
‘अत्रे पत्रकारिता’ पुरस्कार जाहीर झालेले खांडेकर ‘ए.बी.पी. माझा’ वृत्तवाहिनीचे संपादक आहेत. दूरचित्रवाणीवरील विविध मालिकांमधून भूमिका साकारणाऱ्या पाठारे यांना ‘अत्रे कलाकार’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. खुटवड यांना ‘अत्रे साहित्यिक’ पुरस्कार देण्यात येणार असून त्यांनी वृत्तपत्रे व दिवाळी अंकांमधून लेखन केले आहे.