पुण्यातील नारायण पेठ भागात असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयामध्ये मंगळवारी ५ ते ६ अज्ञात तरुणांनी तोडफोड केली. कार्यालयातील लाकडी फर्निचर, काचेच्या वस्तू यांची तोडफोड केल्यावर संपूर्ण कार्यालयात गाड्यांच्या इंजिनमध्ये वापरले जाणारे तेल टाकून हे तरूण तेथून पसार झाले. या घटनेमध्ये कोणीही जखमी झालेले नसून, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात अशा पद्धतीने एका राजकीय पक्षाच्या कार्यालयाची दिवसाढवळ्या तोडफोड करण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात नाराजीचे सूर उमटत आहेत.
तुम्ही केरळमध्ये आमच्या आरएसएसच्या कार्यकर्त्याला मारले. त्यामुळेच आम्ही इथे आलो आहोत, असे हल्लेखोरांपैकी एक जण म्हणाल्याचे कम्युनिस्ट पक्षाचे नेते अजित अभ्यंकर यांनी सांगितले. मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास हे तरूण कार्यालयात आले आणि त्यांनी तोडफोड करण्यास सुरुवात केली. कार्यालयात तेल ओतल्यावर ते तेथून निघून गेले, असेही त्यांनी सांगितले. हिंदुत्त्ववादी संघटनांनी हा हल्ला केल्याचा आरोप अभ्यंकर यांनी केला आहे.