पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसमध्ये असलेल्या तीव्र गटबाजीचा ‘तमाशा’ शनिवारच्या महिला कार्यकर्त्यांच्या कार्यशाळेत होण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. मेळाव्याच्या संयोजिका व महिला शहराध्यक्षा ज्योती भारती यांनी विश्वासात न घेतल्याचा मुद्दा पुढे करून कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार आहे, असे काँग्रेसचे पालिकेतील गटनेते व विरोधी पक्षनेते विनोद नढे यांनी जाहीर केले आहे.
शनिवारी आचार्य अत्रे रंगमंदिरात महिलांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्त्वशीला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाची माहिती गुरूवारी माजी महापौर आझम पानसरे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली, त्याबाबतची आपणास तसेच नगरसेवकांना काहीही कळवण्यात आले नाही. महिलाध्यक्षांच्या एकांगी कारभाराच्या निषेधार्थ या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार असल्याचे नढे यांनी म्हटले आहे. ज्योती भारती यांची पदावरून उचलबांगडी होत असताना, आम्ही नगरसेवकांनी त्यांच्या समर्थनार्थ सह्य़ा केलेले कोरे कागद त्यांच्याकडे दिले होते. त्याच भारती नगरसेवकांना टाळत असतील तर ते चुकीचे आहे. भारती गटबाजीचे राजकारण करत असून आम्ही नगरसेवक या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याचे नढे यांनी जाहीर केले आहे. तर, भारती यांनी त्यांचे आरोप फेटाळले आहेत.