पारदर्शी कारभाराचा धोशा लावणाऱ्या नगरसेवकांना स्वत:च्या बाबतीत मात्र ही पद्धती नको आहे. नगरसेवकांच्या पारंपरिक उपस्थितीच्या पद्धतीऐवजी त्यांच्यासाठी बायोमॅट्रिक्स प्रणाली आणताच त्याला विरोध न करता ती पद्धतीच न वापरण्याचा मार्ग सर्वपक्षीय नगरसेवकांनी अवलंबला आहे. नगरसेवकांना उपस्थितीची अचूक नोंद का नको आहे..

महापालिकेच्या प्रशासकीय कारभाराची वाटचाल सध्या ‘ई-गव्हर्नन्स’कडे सुरू आहे. त्याअंतर्गत विविध सेवांचे संगणकीकरण करण्यात आले आहे आणि बहुतांश विभागांचे कामकाज ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून सुरू आहे. महापालिकेकडून पुरविण्यात येणाऱ्या सेवांचे संगणकीकरण करावे, प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणि पारदर्शीता यावी, अशी आग्रही भूमिका नगरसेवकांकडून सातत्याने मांडण्यात येते. मात्र ‘ई-गव्हर्नन्स’ किंवा ‘पेपरलेस’ कामकाजाचा आग्रह धरणारे नगरसेवकच या ‘पारदर्शी’ कारभारात अडकून पडू इच्छित नाहीत, असे चित्र समोर आले आहे. नगरसेवकांच्या हजेरीसाठी कार्यान्वित करण्यात आलेली ‘बायोमॅट्रिक्स’ प्रणाली त्यांना चांगलीच अडचणीची ठरली आहे. बायोमॅट्रिक्स पद्धतीला सर्वपक्षीय नगरसेवकांचा विरोध का, या प्रश्नाचे उत्तर त्यांचा अहंभाव (इगो) असेच सांगता येईल. महापालिका कायद्यानुसार नगरसेवकांसाठी बायोमॅट्रिक्स पद्धतीने उपस्थिती नोंदविणे बंधनकारक नाही, हे खरे असले तरी एकूणच नगरसेवकांना पारदर्शी कारभार नको आहे, हेच अधोरेखीत झाले आहे. आम्ही निर्णय घेणारे आहोत, आम्हाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जाब विचारणारे कोणीही नकोतच, हीच मानसिकता बायोमॅट्रिक्सकडे पाठ फिरविण्यामागे आहे.
महापालिकेच्या सभागृहाचे नूतनीकरण करण्यात आले त्यावेळी नगरसेवकांसाठी अत्याधुनिक सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यापूर्वी सभेला उपस्थित राहताना नगरसेवकांना हजेरी पुस्तकावर स्वाक्षरी करावी लागत होती. त्यातून अनेक वेळा गैरप्रकारही झाले होते. सभेला उपस्थित न राहता सभेनंतर हजेरी पुस्तकावर स्वाक्षरी करून सभेतील उपस्थिती दर्शविली जात होती. हा प्रकार रोखण्यासाठी सर्वमान्यतेने बायोमॅट्रिक्स प्रणाली बसविण्यात आली खरी; पण त्या पद्धतीचा उपयोग होण्यापेक्षा त्याला काहींचा उघड तर काहींचा छुप्या पद्धतीने विरोधच होऊ लागला आहे. प्रारंभी तांत्रिक स्वरूपात असलेल्या या विरोधामागील खरे कारण आता पुढे यायला लागले. सभेसाठी मिळणाऱ्या भत्त्यावर त्याचा परिणाम होईल, अशी चर्चाही त्यावेळी रंगली होती. मानधन किंवा भत्ता हे एक कारण त्यामागे असण्याची शक्यताही नाकारता येत नाही; पण आम्ही सभेत कधीही येऊ, कधीही जाऊ, काहीही करू, आम्हाला जाब विचारणारे कोणीही नकोत, हीच मानसिकता या विरोधामागे दडली आहे.
शहरातील एका स्वयंसेवी संस्थेने काही दिवसांपूर्वी नगरसेवकांचे हजेरी पुस्तक तयार केले होते. नगरसेवकांची सर्वसाधारण सभेतील उपस्थिती, त्यांनी विचारलेले प्रश्न, प्रभागामध्ये त्यांनी केलेली विविध विकासकामे, त्या कामांचे स्वरूप या बाबींचा लेखाजोखा नगरसचिव कार्यालयाकडील आकडेवारीनुसार त्या संस्थेने जाहीर केला होता. त्यावेळी बाकडी बसविण्यातच बहुतांश नगरसेवक आघाडीवर असल्याचे आणि त्यावर सर्वाधिक खर्च झाल्याचेही स्पष्ट झाले होते. हाताच्या बोटावर मोजता येतील एवढय़ाच नगरसेवकांनी सभागृहात विविध विषयांवर व्यापक पद्धतीने चर्चा केल्याचेही त्या माहितीतून पुढे आले होते. एका बाजूला ही परिस्थिती असतानाच दुसऱ्या बाजूला सभागृहात येऊन नागरी प्रश्नांवर चर्चा करण्यापेक्षा नगरसेवकांना आंदोलने करून राजकीय पोळी भाजण्यातच अधिक रस आहे. त्यामुळे सभागृहातील उपस्थितीच्या बाबतीत या पद्धतीमधील पारदर्शीपणाच त्यांना नको आहे. त्यासाठी अशा उपस्थिती नोंदीची कायद्यात तरतूद नाही, असे कारण पुढे केले आहे. नगरसेवक हे शहराचे विश्वस्त आहेत. किंबहुना आम्ही विश्वस्त आहोत, असे नगरसेवक सातत्याने प्रशासनातील अधिकाऱ्यांना सुनावत असतात. वास्तविक कायद्यात तशी तरतूद नसेलही; पण स्वयंप्रेरणेने कारभारात पारदर्शीपणा आणणे ही देखील नगरसेवकांची जबाबदारी नाही का? कायद्यातील तरतुदीपेक्षा स्वयंशिस्तीसाठी आणि सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे चालण्यासाठीच्या आवश्यक आधुनिक साधनांपैकी ही एक यंत्रणा आहे.
नगरसेवकांनी या नव्या प्रणालीला अंगठा दाखवला आहे; मात्र महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्या पद्धतीचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे, अशीही नगरसेवकांची अपेक्षा आहे. त्यासाठी राजकीय मतभेद विसरून सर्व नगरसेवक एकत्र आले आहेत. नगरसचिव कार्यालयाकडून या सर्व बाबींचे सध्या नियंत्रण केले जात आहे. या प्रणालीचा अवलंब केला तर त्या विभागाचे वर्चस्व वाढण्याची शक्यता आहे, असेही नगरसेवकांना वाटते. त्यामुळेच या प्रणालीला नगरसेवक नाकारत आहेत. आमच्या उपस्थितीबाबत आम्हाला प्रश्न विचारणारे तुम्ही कोण, असा नगरसेवकांचा छुपा प्रश्न आहे. शहर विकासासाठी पारदर्शी कारभाराची अपेक्षा ठेवणाऱ्यांना स्वत:च्या बाबतीत मात्र पारदर्शी कारभार नको आहे, हेच या निमित्ताने दिसत आहे.