लष्कर भागातील शिवाजी मार्केट परिसर. तेथे खुलेआम मटक्याचा धंदा चालतो. लहान मुले-मुली, कॉलेजला जाणाऱ्या युवती यांच्यासमोर हे सुरू असते. तेथून जाणाऱ्या मुलींची छेड काढली जाते. या सर्व प्रकारामुळे त्रस्त झालेले नागरिक पोलिसांकडे तक्रार करतात. ती अर्थातच निनावी. कारण धंदा चालवणाऱ्या महिलेची तेथे मोठी दहशत असते. या बेकायदेशीर धंद्याला पोलिसांचेच संरक्षण असल्याने त्यावर कारवाई होत नाही.. तेथील रहिवासी पुन्हा तक्रार करतात, पण त्यानंतरही हालचाल होत नाही. हतबल नागरिक अजूनही वाट पाहत आहेत, तो धंदा बंद होण्याची आणि त्यामुळे होणारा त्रास कमी होण्याची!
लष्कर भागातील त्रस्त नागरिकांनी याबाबत ‘लोकसत्ता’कडे निवेदन दिले आहे. त्यात तेथील बेकायदेशीर धंदे, दहशत आणि त्यामुळे होणारा त्रास याचे कथन केले आहे. शिवाजी मार्केट परिसरात बिस्मिल्ला हॉटेलच्या समोर रिक्षामध्ये मटका खेळला जातो. त्याचबरोबर सिद्धार्थ वाचनालयाच्या गल्लीतही अशाच प्रकारे मटक्याचा धंदा सुरू असल्याचे नागरिकांनी या निवेदनात म्हटले आहे. त्याचा ताबा तेथील एका महिलेकडे आहे. ती हा बेकायदेशीर धंदा हाताळते. तिच्या गळ्यात मोबाईल लटकवलेला असतो. त्या भागात तिची मोठी दहशत आहे. ती लोकांना शिवीगाळ करते आणि तेथे खेळणाऱ्या लहान मुलांना मारहाण करते. या प्रकाराबरोबरच तेथे जमणाऱ्या तरुणांकडून शाळकरी युवतींची छेड काढली जाते. हे सर्व प्रकार लहान मुलांच्या देखत सुरू असतात. त्यामुळे या मुलांवर विरपरित परिणाम होत आहे, अशी भीतीही या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
हे धंदे करणाऱ्या लोकांची त्या परिसरात मोठी दहशत आहे. या उद्योगांमध्ये पोलीस अधिकारीसुद्धा सामील आहेत, असा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे लोक स्वत:च्या नावाने तक्रार द्यायला घाबरतात. त्यामुळेच तेथील नागरिकांनी काही दिवसांपूर्वी निनावी तक्रार दिली होती. मात्र त्यावर पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही, अशी तक्रारही या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत पोलीस आयुक्त तसेच, विविध वर्तमानपत्रांना पाठवण्यात आली. मात्र, त्याची पोलिसांकडून अद्याप दखल घेण्यात आलेली नाही. हे प्रकार न रोखल्यास काही गंभीर घटना घडू शकतात. त्याचा विचार करून पोलिसांनी या प्रकरणांमध्ये तातडीने लक्ष घालावे, असे आवाहनही या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.