आपल्याकडील लोकशाही पुढारी, दलाल आणि ठेकेदारांसाठी राबवली जाते, अशी टीका ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी भोसरीत बोलताना केली. घाम गाळणारा कष्टाळू माणूस भ्रष्टाचार करत नाही, अशी टिप्पणी करत भ्रष्टाचाराच्या महाभयंकर रोगाला माहिती अधिकार कायद्यामुळे भविष्यात पायबंद बसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
माहिती अधिकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल वाघ यांच्या हस्ते विवेक वेलणकर यांना ‘माहिती अधिकार योगदान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तेव्हा ते बोलत होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय सायकर, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष पंढरीनाथ कामथे आदी उपस्थित होते. वाघ म्हणाले,की शासकीय अधिकारी गोचिडासारखे जनतेचे शोषण करतात. धैर्य व जिद्दीने वेलणकर भ्रष्ट यंत्रणेविरूध्द लढत राहिले. सुस्त शासकीय यंत्रणेला त्यांनी जागे केले. अशा कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणे समाजाचे कर्तव्य आहे. वेलणकर म्हणाले,‘ माहिती अधिकार कायद्याचा वापर अधिकाधिक नागरिकांनी केला पाहिजे. लाच देण्यापेक्षा माहिती अधिकार कायद्याचा अर्ज दाखल करण्याची मानसिकता ठेवावी.’ प्रास्ताविक दत्तात्रय सायकर यांनी केले. सूत्रसंचालन सुनंदा सुपणेकर यांनी आभार मानले.