भाषा संशोधक डॉ. गणेश देवी यांची भावना

भाषा संशोधनाच्या कामामध्ये गुंतून घेतले असल्यामुळे सध्या किमान तीन-चार वर्षे तरी मी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी उत्सुक नाही, अशी भावना ज्येष्ठ भाषा संशोधक डॉ. गणेश देवी यांनी शुक्रवारी व्यक्त केली. २०२० नंतर संमेलनाचे अध्यक्षपद बिनविरोध माझ्याकडे आले तर मी तो माझा बहुमानच समजेन, असेही त्यांनी सांगितले.

डोंबिवली येथे होणाऱ्या आगामी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भाषातज्ज्ञ आणि सामाजिक सौहार्दासाठी कार्यरत असलेले डॉ. गणेश देवी यांचे नाव प्रसिद्ध लेखक राजन खान यांनी सुचविले होते. मात्र, कामाच्या व्यापामुळे पुढील किमान तीन-चार वर्षे तरी अध्यक्षपदासाठी उत्सुक नसल्याचे दस्तुरखुद्द गणेश देवी यांनीच स्पष्ट केले आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी चांगल्या व्यक्तीची बिनविरोध निवड व्हावी असा विचार राजन खान यांच्याशी बोलताना आला होता. घुमान येथील साहित्य संमेलनामध्ये आमची या विषयावर चर्चा झाली होती. असे होत असेल तर चांगलेच आहे, असे मी त्यांना सांगितले होते, असे डॉ. गणेश देवी यांनी सांगितले. युनेस्कोने जगभरातील सर्व भाषांच्या संख्यात्मक संशोधनाचे काम माझ्यावर सोपविले आहे. ही जबाबदारी मी नुकतीच स्वीकारली आहे. या कामासाठी मला केवळ राज्याबाहेरच नव्हे तर स्पेन, फ्रान्स, नायजेरिया यांसारख्या देशांमध्ये रहावे लागणार आहे. अशा वेळी मराठी साहित्य संमेलनासाठी वेळ देता येणार नसल्याने मी अध्यक्षपदासाठीचा उमेदवार नाही. या संशोधन कामाच्या पूर्तीसाठी तीन-चार वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे २०२० पर्यंत तरी मी अध्यक्षपदासाठी उत्सुक नाही. त्यानंतर माझी बिनविरोध निवड झाली तर मी हा माझा बहुमान समजेन, असेही डॉ. गणेश देवी यांनी सांगितले.