स्वरयज्ञ महोत्सवात आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते वितरण
संगीत विकास सभा पुणे आणि नसरापूर येथील माउली संगीत विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पं. गजाननबुवा जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नुकताच नसरापूर येथे ‘स्वरयज्ञ महोत्सव’ पार पडला. महोत्सवात गायक डॉ. विकास कशाळकर यांना कै. संगीताचार्य ज्ञानेश्वर माउली लिम्हण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा गुरूमाउली पुरस्कार आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच अ. भा. गांधर्व महाविद्यालयाचे सचिव प्रसिद्ध तबलावादक पं. पांडुरंग मुखडे यांच्या हस्ते मृदंगरत्न पं. गोिवद भिलारे यांना संतसंगीत भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
स्वरयज्ञ महोत्सवाचे यंदाचे सहावे वर्ष असून या महोत्सवात जगाच्या कानाकोपऱ्यात भारतीय संगीताचा प्रसार व्हावा या उद्देशाने संगीत विकास सभेतर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘ई मासिकाचे’ अनावरणही थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले. भारतीय संगीताच्या विविध पलूंवर भाष्य करणारे अनेक नामवंत संगीत अभ्यासकांचे लेख या मासिकात असतील असे डॉ. कशाळकर यांनी यावेळी सांगितले.
दोन दिवस चाललेल्या या स्वरयज्ञ महोत्सवात गुरुवर्य डॉ. विकास कशाळकर आणि त्यांच्या शिष्यांचा शास्त्रीय संगीताचा आविष्कारही रसिकांसमोर सादर केल्या. गायत्री शिंदे, श्रुती खरवंडीकर, शशांक लिमये, नूपुर जोशी, तुलिका पंडित, वृषाली काटकर, गोविंद गोसावी, प्रसाद कुलकर्णी, वैष्णवी कुलकर्णी, मकरंद सरपोतदार, महेश बेंद्रे, पवन नाईक, ओंकार देऊळगावकर, अंजली मालकर आदी साठ कलाकारांनी गायनकला सादर केली. त्यांना संवादिनीवर प्रवीण कासलीकर, मकरंद खरवंडीकर, आशिष कुलकर्णी, उपेंद्र सहस्रबुद्धे यांनी तर तबल्यावर हर्षद भावे, हरीश भावसार, प्रसाद सुवर्णपाटकी, ओंकार देगलूरकर यांनी साथसंगत केली.