सुशिक्षित तरूण दहशतवादाच्या मार्गावर असून ती चिंतेची बाब आहे, असे मत सिंबायोसिसचे संस्थापक शां. ब. मुजूमदार यांनी निगडी येथे बोलताना व्यक्त केले. उच्च शिक्षण समस्या निर्माण करणारे नसावे, असे सांगत कौशल्य विकास हाच शिक्षणाचा मंत्र व्हायला हवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी केंद्राचे प्रमुख वा. ना. अभ्यंकर (भाऊ) यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित सोहळ्याच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. स्वामी सर्वलोकानंद, इंदिराबाई अभ्यंकर, खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, महापौर शकुंतला धराडे, आयुक्त राजीव जाधव, पालिकेतील सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम, संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. विश्वास मेहेंदळे, संचालक गिरीश बापट आदी उपस्थित होते. या वेळी पालिकेच्या वतीने अभ्यंकर यांना मानपत्र प्रदान करण्यात आले, तेव्हा स्थानिक नगरसेवक आर. एस. कुमार, राजू मिसाळ, नंदा ताकवणे, भारती फरांदे, प्रतिभा भालेराव आदी उपस्थित होते.
मुजूमदार म्हणाले,‘‘आजच्या शिक्षणावर दृष्टिक्षेप टाकल्यास खूप निराशा येते. ज्या शिक्षणाने व्यक्ती, कुटुंब, समाज व पर्यायाने देशाचा विकास साधला पाहिजे, ते शिक्षण आज निराशा निर्माण करणारे झाले आहे. या शिक्षणातून विविध प्रश्न सुटणे अपेक्षित असताना नवीन प्रश्न निर्माण होत आहेत. अनेक सुशिक्षित दहशतवादाच्या मार्गावर जाताना दिसतात. अमेरिकेत टॉवर पाडणारे अतिरेकी उच्चशिक्षित होते. सुशिक्षित तरूण दहशतवादी होऊ लागल्याची परिस्थिती चिंताजनक आहे. भारतात लाखो विद्यार्थी पदवीधर होतात, त्यांची पुढे काय अवस्था असते? शिपाई, लिपिकाच्या जागांसाठी पदवीधरांचेच अर्ज असतात. शिक्षण व उच्च शिक्षणाने समस्या वाढणार असतील तर ते शिक्षण कशासाठी, कोणासाठी,’’ असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. शिक्षणातून आंतरिक विकास आणि व्यवहार हित उपयुक्त शिक्षण या दोन्हींचा समन्वय साधला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करत वा. ना. अभ्यंकर यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला आणि संस्थेच्या प्रगतीत अनेकांनी केलेल्या सहकार्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. प्रास्ताविक मनोज देवळेकर यांनी केले. आदित्य शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. प्रदीप पाटील यांनी आभार मानले.