पुणे शहराला दररोज सुमारे ९०० एमएलडी पाणी लागते. त्यापैकी ७४४ एमएलडी पाण्याचे रुपांतर हे वापरलेल्या पाण्यामध्ये होते आणि पुढे नदीमध्ये सोडले जाते. या वापरलेल्या पाण्यावर योग्य प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याचे तंत्रज्ञान या क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्या सहकारी गृहरचना संस्थांच्या प्रतिनिधींचे प्रबोधन करणार आहेत. वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी योग्य रितीने वापरले, तर शुद्ध पाण्याची मागणी पन्नास टक्क्यांनी कमी होईल.
सध्याच्या पाणीटंचाईवर एन्व्हायर्नमेंटल क्लब ऑफ इंडियाने हा उपाय सुचविला असून पाण्याचा पुनर्वापर गरजेचा असल्याने त्यावरच अधिकाधिक भर दिला पाहिजे, या मतापर्यंत येऊन पोहोचलो असल्याचे क्लबचे पुणे अध्यक्ष नितीन देशपांडे यांनी सांगितले. राज्यातील पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून शहर आणि जिल्ह्य़ालाही पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या पाणी सुविधेतील मर्यादांमुळे पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) हा परिणामकारक पर्याय आहे. परंतु, तो थोडय़ा कालावधीपुरता मर्यादित असल्यामुळे सांडपाण्यावर सुरक्षित आणि योग्य प्रक्रिया करून त्या पाण्याच्या पुनर्वापरावर भर देण्यास प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. या प्रक्रियायुक्त सांडपाण्याचा वापर बागबगिचा आणि स्वच्छतागृहामधील फ्लशिंग यांसारख्या कारणांसाठी होऊ शकतो, असेही देशपांडे यांनी सांगितले.
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासंदर्भात क्लबने शुक्रवारी (६ मे) पत्रकार भवन येथे एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे. ‘महाराष्ट्रातील पाण्याची उपलब्धता आणि सद्य:स्थिती’, ‘भूगर्भातील पाणीसाठा’, ‘पाण्याच्या जबाबदारीने आणि परिणामकारक वापराच्या सवयी’, ‘प्रक्रियायुक्त पाण्याचा पुनर्वापर आणि प्रक्रियायुक्त सांडपाणी’ अशा विषयांवर जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंदा हेमंत गुणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. नितीन करमळकर, ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट संस्थेचे उपसंचालक आशीष देवस्थळी, सांडपाणी प्रक्रियातज्ज्ञ रजनीश आडकर, डेक्कन एन्व्हायर्नमेंटचे संचालक आमोद घमंडे, जनकल्याण समितीचे सचिन अंबर्डेकर मार्गदर्शन करणार आहेत. पालकमंत्री गिरीश बापट, पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे आणि आमदार मेधा कुलकर्णी या कार्यशाळेस भेट देणार असल्याचेही देशपांडे यांनी सांगितले.