देशाच्या अंतराळ मोहिमांची पायाभरणी करणारे, सलग चार पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागारपद भूषवणारे व मोसमी पावसाच्या अंदाजाचे प्रसिद्ध प्रारूप तयार करणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर (८१) यांचे शुक्रवारी येथे निधन झाले. डेंग्यू व मूत्रमार्गातील संसर्ग या आजारांनी ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते.
विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र व भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) या दोन्ही प्रमुख संस्थांचे प्रमुखपद डॉ. गोवारीकर यांनी सांभाळले होते. डॉ. गोवारीकर १९६७ मध्ये केरळच्या अंतराळ केंद्रात रॉकेट इंधन अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यानंतर ‘केमिकल्स अँड मटेरिअल्स’ समूहाचे संचालक, विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्राचे प्रमुख आणि नंतर इस्रोचे प्रमुख ही महत्त्वाची पदे त्यांनी भूषवली. ते सलग चार पंतप्रधानांचे विज्ञान व तंत्रज्ञानविषयक सल्लागार होते. या काळात त्यांनी मोसमी पावसाचा अंदाज वर्तवणाऱ्या पथकाचे नेतृत्व केले.
त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सायंकाळी येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बंधू व ज्येष्ठ शास्त्रज्ञ शंकरराव गोवारीकर, पुतणे व प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, छायाचित्रकार अविनाश गोवारीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

वाचकस्नेही वैज्ञानिक
अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात विज्ञान प्रसाराबाबत परिस्थिती बरी आहे याचे श्रेय डॉ. वसंत गोवारीकर यांच्यासारख्या वाचकस्नेही वैज्ञानिकाकडेच जाते. वयाच्या अवघ्या ११व्या वर्षी चरखा चक्रावरील संशोधन ते २८व्या वर्षी ऑक्सफर्ड विद्यापीठात परीक्षक म्हणून नियुक्ती यातून डॉ. गोवारीकर यांच्या बुद्धीची चमक आणि तिचा विविधांगी संचार लक्षात येतो. डॉ. विक्रम साराभाई यांच्यासमवेत अवकाश प्रक्षेपक विकासात डॉ. गोवारीकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यातूनच एसएलव्हीचे यशस्वी प्रक्षेपण आपण करू शकलो. पुढे डॉ. गोवारीकर हे भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे -इस्रोचे- संचालकही झाले. जनसामान्यांना ते लक्षात आहेत ते हवामान अंदाजाच्या त्यांनी विकसित केलेल्या प्रारूपांमुळे. तोपर्यंत टिंगलीचा विषय असलेला हवामानाचा अंदाज खरा ठरू लागण्यात डॉ. गोवारीकर यांचा मोठा वाटा आहे. भारताच्या लोकसंख्या विस्ताराबाबतही त्यांनी मूलगामी विवेचन केले होते. इतकी विविधांगी गती असलेला वैज्ञानिक रूक्ष आणि जनतेपासून फटकून राहणारा असू शकतो. डॉ. गोवारीकर तसे नव्हते. या सहजसंवादी विज्ञानवाद्यास ‘लोकसत्ता’ची आदरांजली.