‘खगोलशास्त्रामध्ये उत्तम संशोधन होण्यासाठी शालेय अभ्यासक्रमामध्येच खगोलशास्त्राचा समावेश करण्यात यावा आणि खगोलशास्त्राकडे भूगोल विषयातील उपभाग म्हणून न पाहता, विज्ञानातील विषय म्हणून तो शिकवला जावा,’ असे मत ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी आयुकाच्या रौप्य महोत्सवी वर्धापनदिन सोहळ्यामध्ये रविवारी व्यक्त केले.
आयुकाचा पंचविसावा वर्धापनदिन रविवारी साजरा झाला. या वेळी आयुकाच्या स्थापनेमध्ये सहभागी असलेल्या डॉ. नारळीकरांनी आयुकातील आठवणींना उजाळा देऊन आयुकाचा प्रवास उलगडला. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ‘सेंटर फॉर एक्सलन्स’ योजनेमधून पुणे विद्यापीठात २९ डिसेंबर १९८८ मध्ये आयुकाची स्थापना झाली.
या वेळी डॉ. नारळीकर म्हणाले, ‘खगोलशास्त्रासारख्या विषयामध्ये अधिक चांगले संशोधन होण्यासाठी आयुकासारख्या संस्थांची गरज आहे. त्याचप्रमाणे शालेय अभ्यासक्रमामध्ये खगोलशास्त्राचा समावेश करणे आवश्यक आहे. सध्या शालेय अभ्यासक्रमामध्ये खगोलशास्त्राची थोडीशी ओळख करून देण्यात आलेली आहे. मात्र, शालेय अभ्यासक्रमात भूगोल विषयाचा उपघटक म्हणून खगोलशास्त्राचा समावेश केलेला दिसतो. मात्र, विज्ञान विषयामध्ये खगोलशास्त्राचा समावेश करणे गरजेचे आहे.
खगोलशास्त्रातील संशोधनामध्ये आदर्श मानावी अशी आयुका ही संस्था उभी राहिली आहे. त्याचबरोबर इतर विषयातील संशोधकांसाठीही संस्था म्हणून आयुका अनुकरणीय आहे. संस्था मोठी होत जाते, तसा तिचा पायाभूत मूल्यांशी संबंध कमी होत जातो. मात्र, आयुका कायमच तिच्या मूळ उद्देशांशी जोडलेली राहील असा विश्वास वाटतो.’’