दिवाळी म्हटलं की नवीन कपडे, दागिने, पर्स, मिठाई असे चित्र प्रत्येक मुलीच्या डोळ्यासमोर उभे राहते. सर्वसामान्य घरातील मुलींना त्यांचे आई-वडील बाजारात नेऊन ही खरेदी करून देतात. पण, ज्यांच्या वाटय़ाला हे भाग्य नाही अशा अनाथ मुलींनी वसुबारस या दिवाळीच्या पहिल्याच दिवशी तुळशीबागेत मनमुराद खरेदीची दिवाळी साजरी केली.
तुळशीबाग सार्वजनिक गणपती मंडळातर्फे अनाथ हिंदूू महिलाश्रमातील मुलींसाठी दिवाळी खरेदी उपक्रम आयोजित करण्यात आला होता. दत्तात्रय कावरे, मोहन साखरिया, चंद्रकांत ठक्कर, किरण गाला, प्रवीण सोनावर या व्यावसायिकांनी महिलाश्रमातील २२ मुलींसाठीच्या खरेदीचा खर्च आनंदाने केला. मंडळाचे नितीन पंडित, प्रदीप इंगळे, सदाशिव कुंदेन, स्वाती ओतारी, विकास पवार, विनायक कदम या वेळी उपस्थित होते.
आम्हालाही कोणीतरी खरेदीला न्यावे ही इच्छा पूर्ण झाली. नवे कपडे, दागिने, पर्स आणि मिठाई यामुळे ही वेगळी दिवाळी अनुभवली असल्याचे या मुलींनी सांगितले. केवळ भेटवस्तू किंवा फराळाचे साहित्य देण्यापेक्षा खरेदीचा प्रत्यक्ष आनंद मुलींना मिळावा यासाठी गेली सहा वर्षे हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे नितीन पंडित यांनी सांगितले.
फराळ, फटाके आणि नव्या पोशाखाने चिमुकले भारावले
पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती करीत रस्त्यावरचं आयुष्य जगणाऱ्या मुलांनी फराळ, फटाके आणि नव्या पोशाखामध्ये दिवाळी साजरी केली.
युवक काँग्रेसचे सरचिटणीस अमित बागूल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वसुबारसचा मुहूर्त साधून शंकरशेठ रस्त्यावरील पदपथावर राहणाऱ्या कुटुंबांना दिवाळीचा आनंद दिला. एक वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या या कुटुंबांना सणाचा आनंद मिळेल हे स्वप्न शनिवारी सत्यामध्ये अवतरले. कार्यकर्त्यांनी सुवासिक उटणे आणि सुगंधी तेल लावून मुलांना अभ्यंगस्नान घातले. ‘काकां’नी दिलेला नवीन पोशाख परिधान करून सज्ज झालेल्या या मुलांचे औक्षण करण्यात आले. नकळत्या वयामध्ये भिक मागण्यापासून ते फुगे विकून आपल्या कुटुंबाला हातभार लावणारे हे चिमुकले या शाही थाटामुळे भारावून गेले. आपल्या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहताना पालकही गहिवरले होते. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले.
स्वस्त फराळ विक्री केंद्राचे उद्घाटन
शिवसेनेतर्फे रवींद्र नाईक चौक येथे सुरू करण्यात आलेल्या स्वस्त फराळ विक्री केंद्राचे उद्घाटन संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते नुकतेच झाले. बुंदीचे लाडू, बेसन लाडू, चकली, चिवडा, करंजी हे पदार्थ रास्त दरामध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. गेली ३० वर्षे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शहरप्रमुख विनायक निम्हण, महापालिका गटनेते अशोक हरणावळ, विभागप्रमुख दत्ता जाधव, नगरसेविका सोनम झेंडे यांच्यासह पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.