जाणकारांकडून विविध क्षेत्रात करिअर घडवण्याचा मूलमंत्र; ‘मार्ग यशाचा’ कार्यशाळेस भरघोस प्रतिसाद

‘जेईई’ आणि ‘नीट’ ही नावे ऐकताच अनेकांच्या पोटात भीतीने गोळाच येतो. परंतु काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्या, तर या परीक्षाही अवघड नाहीत. वैद्यकीय आणि अभियांत्रिकीसाठीच्या प्रवेश परीक्षांमधील यशाचा मार्ग या क्षेत्रातील जाणकारांनी उलगडला. तसेच विविध क्षेत्रांत करिअर कसे घडवता येईल, याचे मार्गदर्शनही विद्यार्थ्यांना मिळाले.

ही कार्यशाळा आजही (शुक्रवार-२६ मे) सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळात होणार असून त्यासाठी कार्यक्रमस्थळी नोंदणी करण्यात येणार आहे. आगाऊ नोंदणी करूनही गुरुवारी उपस्थित न राहू शकलेले विद्यार्थी शुक्रवारी कार्यशाळेत सहभागी होऊ शकतील.

दहावी व बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘लोकसत्ता’तर्फे ‘मार्ग यशाचा’ या करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या   कार्यशाळेच्या पहिल्या दिवसाचे उद्घाटन गुरुवारी ‘पीएमपीएमएल’चे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्या हस्ते करण्यात आले. दहावी, अकरावी आणि बारावी या तिन्ही वर्षांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनीही या कार्यशाळेसाठी मोठी गर्दी तर केलीच, शिवाय प्रत्येक वक्तयाला उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसनही करून घेतले.

वैद्यकीय आणि अभियांत्रिकीसाठीच्या प्रवेश परीक्षा झाल्या असल्यामुळे त्याच्या प्रवेश प्रक्रियेबद्दल विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. शिवाय या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांनी पुढील वर्षांच्या प्रवेश परीक्षांची तयारीही सुरू केली आहे. या परीक्षा कशा द्याव्यात, नियोजन कसे करावे याच्या महत्त्वाच्या ‘टिप्स’ डॉ. अभय अभ्यंकर आणि डॉ. अतुल ढाकणे यांनी दिल्या. या दोन क्षेत्रांसह ज्यात उत्तम करिअर घडवणे शक्य आहे अशा विविध क्षेत्रांविषयी त्या-त्या तज्ज्ञांशी विद्यार्थ्यांना संवाद साधता आला.

आज उद्घाटन चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते

शुक्रवारी कार्यशाळेचे उद्घाटन विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते होणार असून ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. ज्या वक्तयांनी गुरुवारी मार्गदर्शन केले, त्यांनाच शुक्रवारी पुन्हा ऐकण्याची संधी विद्यार्थी व पालकांना मिळणार आहे. या दिवशी थेट कार्यक्रमस्थळी येणाऱ्या विद्यार्थी व पालकांना प्रवेश दिला जाईल, शिवाय जे लोक आगाऊ नोंदणी करूनही गुरुवारी येऊ शकले नाहीत ते देखील शुक्रवारी येऊ शकणार आहेत.

* कार्यशाळा कधी- २६ मे, सकाळी ९ ते सायंकाळी ५

* कुठे – हॉटेल सेंट्रल पार्क, बापूसाहेब गुप्ते मार्ग, (जंगलीमहाराज रस्त्याजवळ) शिवाजीनगर