‘लोकसत्ता रिअल इस्टेट कॉन्क्लेव्ह’चे रविवारी आयोजन
केंद्र सरकारने पुण्याची निवड स्मार्ट सिटी अभियानासाठी केल्यानंतर शहराला स्मार्ट बनवण्याच्या दृष्टीने बांधकाम व्यावसायिकांसह अनेक उद्योगसंस्थाही पुढे येत आहेत. या निमित्ताने ‘पुण्यातील रिअल इस्टेट : वाटचाल भविष्याकडे’ या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (२९ मे) पुण्यात खास चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘लोकसत्ता’तर्फे आयोजित या परिषदेत बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक, तज्ज्ञ आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी सहभागी होणार आहेत.
‘फिनोलेक्स पाइप्स’ प्रेझेंट्स ‘लोकसत्ता रिअल इस्टेट कॉन्क्लेव्ह २०१६’ पॉवर्ड बाय बी. यू. भंडारी आणि बँक ऑफ महाराष्ट्र या परिषदेत ‘पुण्याला स्मार्ट सिटी करण्यासाठी शहरातील पायाभूत सेवा-सुविधांचा विकास’ या विषयासह अनेकविध शासकीय खात्यांच्या परवानग्यांसंबंधी बांधकाम व्यावसायिकांपुढे ज्या समस्या उभ्या आहेत, त्या समस्यांवर प्रामुख्याने चर्चा होईल. ही परिषद फक्त निमंत्रितांसाठी आहे.
पुण्यनगरीला खऱ्या अर्थाने स्मार्ट बनवण्यासाठी अनेक योजना आणि उपायांची आवश्यकता असून त्यासाठी उद्योजक तसेच विविध क्षेत्रातील व्यावसायिक आणि तज्ज्ञांनी पुढाकार घेतला आहे. बांधकाम उद्योगातील अनेक प्रथितयश व्यावसायिकही महापालिकेला साहाय्य करण्यासाठी पुढे आले असून या सर्वासमोर आज जे प्रश्न उभे राहात आहेत, त्यासंबंधीची चर्चा मुख्यमंत्र्यांबरोबर व्हावी, असा या खास परिषदेच्या आयोजनामागील उद्देश आहे.
‘लोकसत्ता रिअल इस्टेट कॉन्क्लेव्ह २०१६’ या मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या परिषदेत मेट्रोपोलिटियन कमिशनर आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे, पुणे महापालिका आयुक्त कुणाल कुमार, पिंपरी महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या समवेत उपस्थित निमंत्रितांना ‘पुण्यातील रिअल इस्टेट : वाटचाल भविष्याकडे’ या विषयावर चर्चा करायला मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या मुख्य भाषणानंतर प्रश्नोत्तरांचाही कार्यक्रम परिषदेत होणार आहे.