* नाथे समूह प्रस्तुत लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धेत नेहा देसाई महाअंतिम फेरीत
पुणे विभागाच्या अंतिम फेरीत मुलींनी बाजी मारली आहे. सध्याच्या राजकीय, सामाजिक विषयांकडे पाहण्याचा तरुणाईचा दृष्टिकोन, परिस्थितीची चिकित्सा करण्याची क्षमता असे तरुणाईचे पैलू नाथे समूह प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफाइसच्या सहकार्याने ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत बुधवारी समोर आले. ‘स्पष्ट, अभ्यासपूर्ण विचार आणि त्यांची सोपी, सुटसुटीत मांडणी..’ असा मेळ साधत मुलींनी पुणे विभागाच्या अंतिम फेरीत बाजी मारली आहे. आयएलएस विधी महाविद्यालयाची नेहा देसाई प्रथम क्रमांक मिळवून महाअंतिम फेरीत दाखल झाली आहे.
नाथे समूह प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफाइसच्या सहकार्याने लोकसत्ताने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची पुणे विभागाची अंतिम फेरी बुधवारी मोठय़ा उत्साहात झाली. या स्पर्धेसाठी आयुर्विमा महामंडळ, जनकल्याण बँक आणि तन्वी हर्बल
ाांचेही सहकार्य मिळाले आहे. पुणे विभागाच्या अंतिम फेरीत १४ स्पर्धकांनी आपले विचार मांडले. विषयांची अभ्यासपूर्ण मांडणी आणि शैलीदार सादरीकरण हे या फेरीचे वैशिष्टय़ ठरले. या फेरीसाठी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. रमेश पानसे, ज्येष्ठ लेखिका डॉ. अरूणा ढेरे, ज्येष्ठ लेखक डॉ. सदानंद बोरसे यांनी परीक्षण केले. स्पर्धकांच्या आणि श्रोत्यांच्याही उत्साहात उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या स्पर्धेची रंगत परीक्षकांच्या मार्गदर्शनाने वाढवली. श्रोत्यांसाठी घेण्यात आलेल्या प्रश्नमंजूषा स्पर्धेने कार्यक्रमाची रंजकताही वाढवली.
स्पर्धकांचे कौतुक करण्यासाठी पृथ्वी एडिफाईसचे संस्थापक अभय केले, कस्टमर रिलेशन मॅनेजर आरोही जल्लापूरकर, एलआयसीचे डेप्युटी मॅनेजर यशवंत माळी, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंझारराव, उपप्राचार्य डॉ. शामकांत देशमुख, इंडियन एक्स्प्रेस समूहाचे उपाध्यक्ष सुनील नायर, ‘लोकसत्ता’चे सहायक संपादक मुकुंद संगोराम उपस्थित होते.
दरम्यान, रत्नागिरी विभागाची अंतिम फेरी ३१ जानेवारी रोजी नगर वाचनालयातील भागोजी कीर सभागृहात होणार आहे.