रोकड मिळविण्यासाठी नागरिकांची वणवण सुरूच

बँकांच्या खात्यांमध्ये असलेले पैसे मिळविण्यासाठी नागरिकांची वणवण सुरूच असून, शनिवार ते सोमवार या सलग तीन दिवशी बँका बंद आहेत. त्यामुळे शनिवारी अनेकांनी एटीएम केंद्रांकडे मोर्चा वळविल्याने एटीएमवरील रांगांमध्ये आणखी वाढ झाली. अद्यापही शहरातील ऐंशी टक्क्य़ांहून अधिक एटीएम केंद्र उघडली जात नसल्याने नागरिकांची गैरसोय थांबू शकलेली नाही.

[jwplayer f2HtZAlb]

केंद्र शासनाने नोटाबंदी केल्यापासून आजपर्यंत बँका व एटीएम केंद्रांवरील नागरिकांची गर्दी कमी झालेली नाही. उघडय़ा असणाऱ्या एटीएम केंद्रांवर लोक रोजच रांगा लावत आहेत. नोटाबंदीनंतरच्या सुरुवातीच्या कालावधीत सुटीच्या दिवशीही बँका उघडय़ा ठेवून कामकाज करण्यात आले. मात्र, डिसेंबर महिन्यातील दुसरा शनिवारी, साप्ताहिक सुटीचा रविवार व सोमवारी असलेल्या ईदच्या सार्वजनिक सुटीमुळे सलग तीन दिवस बँका बंद ठेवण्यात आल्या आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ामध्ये अनेक नागरिकांचे वेतन बँकांमध्ये जमा झाले आहे. ते मिळविण्यासाठी अनेकांची धडपड सुरू आहे. सुटीमध्ये बँकांतील रोकड एटीएममध्ये भरली जाईल की नाही, याबाबत साशंकता असल्याने शुक्रवारपासूनच एटीएमवरील रांगांमध्ये वाढ झाली होती. बँकांमधून एका आठवडय़ाला २४ हजार रुपयांची रोकड मिळेल, असे जाहीर करण्यात आले असले, तरी पुरेशी रोकड नसल्याचे सांगत अनेक बँकांमध्ये खातेदारांना पुरेशी रक्कम दिली जात नाही. शनिवारी बँकाच बंद असल्याने रोकड मिळविण्याचा एकमेव स्रोत असलेल्या एटीएम केंद्रांकडे सकाळपासूनच नागरिकांनी धाव घेतली. अद्यापही शहरातील ऐंशी टक्क्य़ांहून अधिक एटीएम केंद्र उघडलेली नाहीत. काही ठराविक बँकांची एटीएम संध्याकाळनंतर उघडतात. ती उघडण्यापूर्वीच त्यापुढे मोठी रांग लागलेली असते. शनिवारी या रांगांमध्ये आणखी भर पडली. रात्री उशिरापर्यंत रांगा कायम होत्या. रोकड भरली जाण्याची शक्यता असलेल्या काही एटीएमपुढे नागरिक प्रतीक्षा करीत असल्याचेही चित्र होते.

[jwplayer TzwZQwr9]