शहरातील गुंड व गुन्हेगारी टोळ्यांच्या कारवायांमुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात असतानाच मागील काही दिवसांपासून शहरात सोनसाखळी चोरांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. सर्व प्रकारच्या गुन्हेगाराबरोबरच सोनसाखळी चोरांवरही जरब बसविण्याच्या दृष्टीने शहर पोलिसांनी तयारी सुरू केली असल्याचे दिसून येते. त्यामुळेच यापुढे सराईत सोनसाखळी चोरांच्या टोळ्यांनाही ‘मोक्का’ (संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा) लावणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी दिली. बेकायदा पिस्तुले व गावठी कट्टा बाळगणारी मंडळीही पोलिसांनी लक्ष्य केली असून, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी शहर पोलीस स्वतंत्र शाखा सुरू करणार असल्याचेही पोलीस आयुक्तांनी सांगितले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापात पाठक यांनी गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. संघाचे अध्यक्ष महेंद्र बडदे, सरचिटणीस सुनीत भावे त्या वेळी उपस्थित होते. पूर्वीच्या अनुभवातून काही काम केले असून, त्याचा काही परिणामही जाणवला आहे. थोडा वेळ लागेल, पण नक्कीच चांगले काम करू, असा विश्वास व्यक्त करून पाठक म्हणाले, बाजारात सोन्याचे दर वाढल्यानंतर सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली. सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये इराणी टोळ्या सक्रिय आहेत. एका दिवसात सात-आठ सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांनी कारवाई करून हे गुन्हे करणाऱ्या टोळीला अटक केली आहे. त्यामुळे सोनसाखळी चोरीच्या घटना आता कमी झाल्या आहेत. सोनसाखळी चोरीत असणाऱ्या सराईत गुन्हेगारांची माहिती संकलीत करण्याचे कामही करण्यात आले आहे. या गुन्हेगारांवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.
बेकायदा पिस्तूल किंवा गावठी कट्टा बाळगणाऱ्यांच्या प्रश्नावर पाठक म्हणाले, या गुन्हेगारांवर कारवाईसाठी स्वतंत्र शाखा कार्यरत करण्यात येणार आहे. जीवाला धोका असल्याचे कारण सांगून पिस्तूल परवाना मिळवला जातो. मात्र, महाराष्ट्रात तरी त्याची गरज वाटत नाही. पण, तसे झाल्यास महाराष्ट्रही काही दिवसात उत्तर प्रदेश, बिहारसारखा होईल. त्यामुळे गरज असेल त्यांनाच हा परवाना देण्यात येणार आहे.
 शहरात सहा नवीन पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. दोन नवे झोनही तयार करण्यात येणार आहेत. सायबर गुन्ह्य़ांची संख्या लक्षात घेता स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे सुरू करण्यात येणार आहे. शहरातील चार झोनपैकी झोन एकमधील सीसीटीव्ही बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. झोन तीनमध्ये ८० टक्के काम झाले आहे. उर्वरित काम नव्वद दिवसांमध्ये पूर्ण होईल.
 
गुंड व गुन्हेगारी टोळ्यांना जेरबंद करणार
उपलब्ध असलेल्या कायद्यांचा आधार घेऊन शहरातील गुंड व गुन्हेगारी टोळ्यांना जेरबंद करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असल्याचेही पोलीस आयुक्तांनी त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट केले. गुन्हेगारी टोळ्यांमधील हेव्यादाव्यामुळे मोठय़ा प्रमाणावर दहशत पसरविण्याच्या किंवा खुनाच्या घटना घडतात. हे थांबविण्यासाठी व गुंडांवर कारवाईसाठी पोलिसांनी प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत गुंडांची व गुन्हेगारी टोळ्यांची यादी तयार केली आहे. त्यानुसार कारवाई सुरू करण्यात आली असून, त्याबाबत सर्व पोलीस ठाण्यांतील निरीक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांची याबाबत आठवडय़ाला एकदा बैठक घेण्यात येत आहे.