महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा पूर्व परीक्षेत कट ऑफ गुणांपेक्षा जास्त गुण असूनही मुख्य परीक्षेसाठी अपात्र ठरवल्याची तक्रार काही उमेदवारांनी केली आहे. मुख्य परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी १३ ऑगस्टपर्यंत मुदत आहे.
राज्य सेवा पूर्व परीक्षेचा निकाल गेल्या आठवडय़ात जाहीर झाला. आयोगाने जाहीर केलेल्या उत्तरसूचीनुसार पूर्व परीक्षेच्या कट ऑफ गुणांपेक्षा जास्त गुण असूनही मुख्य परीक्षेसाठी अपात्र ठरवल्याची तक्रार काही उमेदवारांनी केली आहे. पूर्व परीक्षेचा खुल्या गटाचा कट ऑफ १२५ आहे. मात्र, १६० च्यावर गुण असूनही अपात्र ठरवल्याची उमेदवारांची तक्रार आहे. याबाबत आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. मात्र, आयोगाकडून काहीच उत्तर देण्यात आलेले नाही. आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेले दूरध्वनी क्रमांकही लागत नाहीत, असे उमेदवारांचे म्हणणे आहे.
‘उमेदवारांना आक्षेप घेण्यासाठी मुदत दिलेली असते. दिलेल्या मुदतीत उमेदवारांनी तक्रार केली असेल, तर त्याची दखल नक्कीच घेण्यात येईल,’ असे आयोगाचे अध्यक्ष व्ही. एन. मोरे यांनी सांगितले.
मुख्य परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी १३ ऑगस्टपर्यंत मुदत असून १२ ते १४ सप्टेंबर या कालावधीत परीक्षा होणार आहे. या वर्षी ३६८ जागांसाठी ही परीक्षा होत आहे.
आयोगाची कामे मार्गी लावा..
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अनेक बाबींवर प्रशासकीय अधिकारी, मंत्रालयातील कर्मचारी यांच्यावर अवलंबून असतो. मात्र, काही वेळा अधिकाऱ्यांनी कामे नाकारल्यामुळे, मंत्रालयातून सहकार्य न मिळाल्यामुळे आयोगाचे निकाल आणि इतर प्रशासकीय कामे खोळंबतात. त्या पाश्र्वभूमीवर ‘सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी आयोगाच्या कामांना प्राधान्य द्यावे. कामे नाकारू नयेत,’ अशी तंबी देणारा आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढला आहे.