नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे गूढ काँग्रेसने दडपले. काँग्रेस सरकारने यापूर्वी दडवून ठेवलेल्या फाईल्स बाहेर काढत नेताजींच्या मृत्यूचे रहस्य उकल करण्यासाठी चौकशी आयोग नेमला जावा, अशी मागणी ‘इंडियाज बिगेस्ट कव्हर अप’ या पुस्तकाचे लेखक अनुज धर यांनी शुक्रवारी केली. नेताजींविषयीची उत्सुकता आणि जागरुकता असल्यामुळेच हे पुस्तक लिहू शकलो. काँग्रेस सत्तेमध्ये असताना हे लेखन केले असते तर मी स्वर्गवासी झालो असतो, असेही धर यांनी सांगितले.
विश्वकर्मा पब्लिकेशन्सतर्फे धर यांच्या पुस्तकाचा अनुवाद असलेल्या ‘नेताजींच्या मृत्यूचे गूढ’ या पुस्तकाचे प्रकाशन अक्षरधारा बुक गॅलरी येथे झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रसिद्ध लेखक आनंद हर्डीकर आणि अनुवादिका डॉ. मीना शेटे-संभू या वेळी उपस्थित होत्या.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात नेताजींचे महत्त्वाचे योगदान होते. मात्र, १९४० नंतर त्यांचे दर्शन घडलेच नाही. तैपेई येथे १९४५ मध्ये झालेल्या कथित विमान अपघातामध्ये नेताजींचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. पण, त्यादिवशी जपानच्या या विमानतळावर कोणताच अपघात झाला नव्हता, याकडे लक्ष वेधून धर यांनी नेताजींच्या मृत्यूचे गूढ उकलणारी फाईल जाणीवपूर्वक का दडविली गेली, असा सवाल उपस्थित केला. १६ हजार पानांची फाईल बाहेर काढल्यानंतर त्यातून बरेच काही निष्पन्न झाले. चौकशी आयोग स्थापन केल्यास अजूनही बऱ्याच गोष्टी बाहेर येतील. दिल्ली येथील नेताजी संस्थेतर्फे २००१ पासून नेताजी नाहीसे होण्यामागचे रहस्य शोधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही धर यांनी सांगितले.
राष्ट्रद्रोही आणि देशद्रोही व्यक्तींच्या मागे उभे राहिल्यानंतर ते ‘हिरो’ होतात, असा टोला कन्हैय्या कुमार याला लगावत धर यांनी देशासाठी प्राण वेचणाऱ्या क्रांतिकारकांचे रहस्य जाणून घेण्यासाठी जनमत का तयार होत नाही, असा प्रश्न उपस्थित केला.