बांधकाम व्यावसायिकांना धमकावून खंडणी उकळणारा छोटा राजन टोळीतील एका गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने पकडले असून, त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. अटक आरोपी हा छोटा राजनचा हस्तक ‘माटय़ा भाई’ याच्यासाठी काम करीत असल्याचे चौकशीत समोर आले आहे.

प्रशांत भगवान वनशिव (वय २८, रा. धायरी गाव, महादेवनगर, सिंहगड रस्ता) असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर खुनाचाही गुन्हा दाखल आहे. पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील यांनी याबाबत माहिती दिली. गुन्हे शाखेचे हवालदार शैलेश जगताप यांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार वनशिव याच्याकडे बेकायदा शस्त्र असल्याचे समजले होते. पिस्तूल विक्रीसाठी तो धायरेश्वर मंदिराजवळ येणार असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी या भागात सापळा लावला. या सापळ्यात तो सापडला. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे सापडली.

वनशिव हा धयरी परिसरातील बांधकाम व्यावसायिकांना छोटय़ा राजनच्या नावाने धमकावून खंडणी उकळत असल्याची माहिती पुढे आली आहे. ज्यांना त्याने धमकावले असेल किंवा खंडणी उकळली असेल त्यांनी न घाबरता याबाबत तक्रार द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. यातील तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असेही कळविण्यात आले आहे. वरिष्ठ निरीक्षक

राजेंद्र कदम, शैलेश जगताप, संतोष पागर, नीलेश पाटील, अशोक आटोळे, राहुल घाडगे, विनायक जारेकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.