’ माउलींची पालखी उद्या प्रस्थान ठेवणार
’ देहू-आळंदीत वैष्णवांचा भक्तिमेळा
आषाढी एकादशीला लाखो वैष्णवांच्या संगतीने पंढरपुरात सावळ्या परब्रह्माच्या भेटीला जाणाऱ्या जगद्गुरू संत तुकाराममहाराजांच्या पालखीचे उद्या (२७ जून) देहूतून प्रस्थान होणार आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींची पालखी आळंदीतून मंगळवारी (२८ जून) प्रस्थान ठेवणार आहे. या सोहळ्याची अनुभूती घेण्यासाठी व पालख्यांसोबत पंढरीनाथाच्या भेटीला जाण्यासाठी देहू व आळंदीमध्ये लाखोच्या संख्येने वारकरी दाखल झाले आहेत. प्रस्थान सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासनाकडूनही तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
तुकोबांच्या पालखीच्या प्रस्थान सोहळ्यानिमित्त देहूमध्ये सोमवारी पहाटेपासूनच विविध कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. पहाटे पाच वाजता महापूजा होईल. त्यानंतर तपोनिधी नारायणमहाराज समाधी महापूजा होणार आहे. सकाळी १० ते दुपारी बारा या वेळेत प्रस्थान सोहळ्यातील काल्याचे कीर्तन सादर होईल. सकाळी नऊ वाजता इनामदार वाडय़ामध्ये तुकोबांच्या पादुकांची महापूजा होणार आहे. दुपारी अडीचच्या पुढे प्रत्यक्ष प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होईल. पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर संध्याकाळी पाच वाजता मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखी इनामदार वाडय़ात मुक्कामी असणार आहे.
माउलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अलंकापुरीत लाखो भाविक दाखल होत आहेत. अंकलीहून निघालेले श्रींचे अश्व सोमवारी आळंदीत दाखल होणार आहेत.
त्यानंतर श्रींचे वैभवी पालखी सोहळ्याचे मंगळवारी माउली मंदिरातील वीणा मंडपातून प्रस्थान होणार आहे. भाविकांच्या स्वागतास अलंकापुरी नगरी सजली आहे. तीर्थक्षेत्रातील विविध ठिकाणी केलेल्या रोषणाईने शहर उजळले आहे.
माउलींच्या पालखीचा मुख्य प्रस्थान सोहळा मंगळवारी दुपारी चार वाजल्यापासून सुरू होणार असल्याची माहिती व्यवस्थापक माउली वीर यांनी दिली. तत्पूर्वी सोहळ्याच्या दिवशी पहाटे चार वाजता घंटानाद, काकडा आरती, पवमान अभिषेक, पंचामृत पूजा व दुधारती होईल.
त्यानंतर पहाटे पाच ते सकाळी नऊ या दरम्यान भाविकांच्या महापूजा आणि श्रींचे समाधी दर्शन होईल. दुपारी बारा वाजेपर्यंत श्रींचे समाधी दर्शनास गाभारा भाविकांसाठी खुला राहील. सकाळी नऊ ते अकरा या वेळात वीणा मंडपात कीर्तन सेवा होईल.