पैसे नसल्याने चहा-नाश्ता दुरापास्त; दोन हजाराची नोट सुटे करण्यासाठी वणवण

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची सध्या चांगलीच तारांबळ उडाली आहे. अभ्यास वर्ग सोडून जवळचे पैसे बँकेत जमा करण्यासाठी आणि नवे पैसे काढण्यासाठी रांगांमध्ये हजेरी लावणे त्यांच्यासाठी सध्या अधिक महत्त्वाचे झाले आहे. प्रयत्नांची शिकस्त केल्यावर पैसे मिळाले तरी दोन हजार रुपयांच्या नोटांचे सुट्टे मिळवण्यासाठी पुन्हा वांदे होत आहेत. त्यामुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांवर चहा, नाश्त्यापासून जेवणापर्यंत आणि झेरॉक्सपासून स्टेशनरीपर्यंत बऱ्याच गोष्टींसाठी उधारी मागण्याचीच वेळ आली आहे.

बरेचसे विद्यार्थी दैनंदिन व्यवहारासाठी जास्त पैसे जवळ बाळगत नाहीत. ते जास्तीत जास्त एटीएमवरच अवलंबून राहत असतात. अशा विद्यार्थ्यांची सध्या मोठीच गैरसोय झाली आहे. या अगोदरही एटीएममधून पैसे काढताना प्रामुख्याने पाचशे व हजारच्याच नोटा हाती येत होत्या. आता नोटाबंदीनंतर एटीएमबाहेरच्या रांगा आणि पटकन संपून जाणारे पैसे हे चित्र असताना सुट्टय़ा पैशांची कमतरता अधिकच भासत असल्याचे विद्यार्थी सांगत आहेत. नाश्ता, जेवण, झेरॉक्स, स्टेशनरी असे छोटे व्यवहार अनेक ठिकाणी ओळखीमुळे उधारीवर होत आहेत. परंतु बाहेर जावे लागल्यानंतर पैशांचे काय करायचे, असा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे आहेच. सध्या काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असून काहींच्या सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे बँकांच्या रांगांमध्ये कमीत कमी वेळ द्यावा लागावा, यासाठी विद्यार्थ्यांसाठी विशेष सोय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही विद्यार्थी करत आहेत.

विद्यार्थी पूर्णपणे एटीएमवर अवलंबून असतात. जास्तीत जास्त पाचशे-सहाशे रुपये जवळ असतात. त्यामुळे सध्या त्याच पैशात सर्व खर्च भागवावा लागत आहे. सुट्टीसाठी गावी गेलेले काही विद्यार्थी तर सुट्टय़ापैशांअभावी गावीच अडकून राहिले आहेत.  – सिद्धेश वाघ, मॉडर्न महाविद्यालय

बँकेतील गर्दी बघून नवीन पैसे घेतलेच नाहीत. अगोदरचे पैसेच जपून वापरतो आहे.  – संतोष चांदणे, समाजशास्त्र विभाग, पुणे विद्यापीठ

एटीएम बहुतांशी बंदच असल्यामुळे जवळ पैसेच नाहीत. त्यामुळे एका वडापाववर वेळ मारून न्यावी लागत आहे. बाकी सर्व व्यवहार ओळखीवर होत आहेत.  – अमोल कनिचे, एम. एस्सी., फग्र्युसन महाविद्यालय

 

विद्यार्थी म्हणतात..

खिशात ५०० रुपये असून खर्च करता येत नाहीत. बाहेर खाण्याचे सध्या हाल सुरू आहेत. कुणी २००० रुपयांची नोट घेत नाही. ही नोट खरी आहे का हाच लोकांमध्ये संशय आहे.  – योगेश बनकर, गरवारे महाविद्यालय

पैसे नसतील तर चलन भरण्यासाठी चेक घेतात. आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी चेकबुक घेतले आहे.  – राधाकृष्ण ठांगे, विद्यार्थी

कॉलेजच्या वेळेत पैसे सुट्टे करून घ्यायचे की लेक्चर करायचे ते सुचत नाही. काही दिवसात परीक्षाही सुरू होत आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी बँकेत वेगळी सोय करावी.  – दिनेश शिंदे, गरवारे महाविद्यालय

कॅन्टीनवाले २००० रुपयाची नोट बदलून घेत नाहीत. जुन्या नोटा देताना पूर्ण पाचशे रुपयांचेच पेट्रोल भरावे लागते.  – सचिन, तत्त्वज्ञान विभाग

नोटाबंदीच्या निर्णयाचे स्वागत आहे परंतु हा नियोजनशून्य कार्यक्रम ठरला आहे. आधीपासूनच त्या दृष्टीने तरतुदी केल्या गेल्या असत्या, तर तारांबळ झाली नसती.’’  – अशोक गव्हाणे, गरवारे महाविद्यालय

नोटा बदलून घेण्यासाठी क्लास सोडून बँकेच्या रांगेत उभे राहावे लागले. -अलका भोयर, एम. कॉम.ची विद्यार्थिनी