यंदाच्या पुणे इंटरनॅशनल चित्रपट महोत्सवात (पिफ) ‘नारबाची वाडी’ आणि ‘७२ मैल एक प्रवास’ या चित्रपटांसह ७ मराठी चित्रपटांमध्ये सवरेत्कृष्ट मराठी चित्रपटासाठीच्या पारितोषिकासाठी चुरस रंगणार आहे. यात सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर दिग्दर्शित ‘अस्तू’, नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’, महेश एलकुंचवार यांच्या लेखनावर आधारित वैभव आबनावे दिग्दर्शित ‘मौनराग’ या चित्रपटांबरोबरच ‘टपाल’ आणि ‘रेगे’ हे अप्रदर्शित चित्रपट पाहण्याची संधी रसिकांना मिळेल.
ज्येष्ठ दिग्दर्शक आणि पिफचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, नाटककार सतीश आळेकर, चित्रपट अभ्यासक समर नखाते, पुणे विद्यापीठाच्या जर्मन विभागाच्या प्रतिनिधी स्वाती आचार्य, पिफच्या उपाध्यक्ष सबीना संघवी आदी या वेळी उपस्थित होते.
जागतिक चित्रपटांसाठीच्या स्पर्धेत ४८ देशांमधील पाचशेहून अधिक चित्रपटांचा समावेश होता. सवरेत्कृष्ट जागतिक चित्रपटासाठीच्या अंतिम फेरीत १४ चित्रपटांची निवड झाली आहे. यात भारताचा ‘कन्यका टॉकिज’ हा चित्रपट स्पर्धेत आहे. या विभागातील सर्वोत्तम चित्रपटास शासनातर्फे दहा लाख रुपयांच्या ‘प्रभात सवरेत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारा’सह सवरेत्कृष्ट दिग्दर्शनासाठी पाच लाखांचे पारितोषिक व विशेष ज्यूरी पारितोषिकही प्रदान करण्यात येईल.
मराठी चित्रपटांच्या स्पर्धेत यंदा ३५ चित्रपटांनी भाग घेतला होता. त्यातून अंतिम फेरीसाठी ७ चित्रपटांची निवड करण्यात आली. या विभागात शासनातर्फे पाच लाख रुपयांचा ‘सवरेत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार’ आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे सवरेत्कृष्ट दिग्दर्शक, पटकथा, छायाचित्रण आणि अभिनयासाठी प्रत्येकी २५ हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येतील.
याशिवाय ‘डी. वाय. पाटील व्हिसलिंग वूडस्’ आंतरराष्ट्रीय विद्यार्थी चित्रपट विभागात सवरेत्कृष्ट चित्रपटासाठीच्या अंतिम फेरीत १२ चित्रपट निवडले गेले आहेत. याबरोबरच १६ अ‍ॅनिमेशनपटांचीही या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.