केंद्र सरकारच्या वतीने मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेतील तिसऱ्या यादीतही पिंपरी-चिंचडवला स्थान मिळू शकले नाही. यापूर्वी, राज्य सरकारने पुणे व पिंपरीचा एकत्रित प्रस्ताव केंद्राला सादर केल्याचा फटका पिंपरीला बसला होता. बदलत्या परिस्थितीत आणि गुणवत्तेच्या जोरावर यंदा तरी उद्योगनगरीचा समावेश होईल, असे वाटत असतानाच पुन्हा डावलल्याने रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी ‘स्मार्ट सिटी’ योजनेतील तिसरी यादी मंगळवारी दिल्लीत जाहीर केली. त्यामध्ये राज्यातील नाशिक, नागपूर, कल्याण-डोंबवली, ठाणे आणि औरंगाबाद या पाच शहरांचा समावेश करण्यात आला आहे. स्मार्ट सिटीच्या पहिल्या यादीत पुणे आणि सोलापूर शहराचा समावेश करण्यात आला होता. दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील एकही शहर नव्हते. तिसऱ्या यादीत पाच शहरे समाविष्ट करण्यात आली, त्यात पिंपरी-चिंचवडचा समावेश नसल्याने पुन्हा एकदा सर्वाच्या भुवया उंचावल्या आहेत. संपूर्णपणे विकसित असलेल्या पिंपरी-चिंचवडला स्मार्ट सिटीच्या पहिल्या यादीत डावलण्यात आल्याचे तीव्र पडसाद उमटले होते. स्थानिक पातळीवर तसेच राज्यस्तरावर बरीच उलथापालथ झाली होती.

ज्येष्ठ खासदार शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पिंपरी पालिकेची सूत्रे असल्याने भाजपने विशेषत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवून पिंपरी पालिकेचा पत्ता कापल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावरून राष्ट्रवादीने भाजप सरकारच्या विरोधात बरेच रान पेटवले होते. शहराचा पुन्हा स्मार्ट सिटीत समावेश व्हावा, यासाठी शरद पवारांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नायडू यांची भेट घेतली, तेव्हा राज्य सरकारने पुणे व पिंपरीचा एकत्रित प्रस्ताव केंद्राकडे सादर केल्याने एका शहराला वगळावे लागल्याची बाब उघड झाली होती. तेव्हा भाजपच्या स्थानिक नेत्यांची पंचाईत झाली होती. शहराचा नव्या यादीत समावेश करण्यात येईल, असे आश्वासन देऊन तेव्हा वेळ मारून नेण्यात आली.

राज्यातील तिसऱ्या यादीत पिंपरी-चिंचवडचे नाव नाही. पुन्हा डावलले गेल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. मात्र, शहराचा स्मार्ट सिटीच्या यादीत समावेश व्हावा, यासाठी पिंपरी पालिकेचे प्रयत्न सुरूच आहेत.

– नीलकंठ पोमण, समन्वयक, पिंपरी-चिंचवड महापालिका