पिंपरी महापालिका सभेत गुरुवारी (२० जुलै) राष्ट्रवादी आणि भाजप आमने-सामने आल्याने गोंधळ झाला. महापौर नितीन काळजे विरुद्ध माजी महापौर योगेश बहल व मंगला कदम असे चित्र सभेत दिसून आले. महापौर काळजे हे विरोधकांना बोलू देत नाहीत, त्यांच्यावर स्वपक्षातून दबाव आहे, अशी खोचक टीका बहल व कदम यांनी केली, तेव्हा तुम्ही महापौर असताना काय केले, सर्वाना माहिती असल्याने आम्हाला काही शिकवू नका, असे प्रत्युत्तर महापौर काळजे यांनी दिले.

महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली जुलै महिन्याची सभा गुरुवारी दुपारी झाली, तेव्हा विषयपत्रिकेवरील विषय संपल्यानंतर िरग रोड व अन्य प्रातिनिधिक समस्यांवर चर्चा pimpri chinchwad municipal corporation करण्याची मागणी विरोधकांनी केली. त्यानुसार, विरोधी पक्षनेते योगेश बहल बोलण्यासाठी उभे राहिले. महापौर विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना बोलू देत नाही, असा आरोप त्यांनी केला. महापौरांवर स्वपक्षातून राजकीय दबाव आहे, अशी टिपणी त्यांनी केली. तेव्हा विषयाला धरून बोला, असे महापौरांनी त्यांना निक्षून सांगितले. ठरावाला उपसूचना स्वीकारणार नाही, असे एकीकडे भाजप नेते सांगत असतात. मात्र, उपसूचना असलेले ठराव मंजूर करण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे, याकडे बहल यांनी लक्ष वेधले. या वेळी सभेत काहीसा गोंधळ सुरू होता. महापौरांनी सर्वाना शांत राहण्याचे आवाहन केले.

विरोधकांच्या टीकेला उद्देशून बोलताना, मी कोणालाही घाबरत नाही, असा दावा महापौरांनी केला. महापौर पूर्वी राष्ट्रवादीचे होते, तेथेच ते तयार झाले आहेत, अशी कोपरखळी मंगला कदम यांनी महापौरांना उद्देशून मारली. तेव्हा, तुम्ही महापौर असताना काय-काय केले, हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला

शिकवू नका. मी कोणाला घाबरत नाही आणि कोणाचा माझ्यावर दबावही नाही, असे प्रत्युत्तर महापौरांनी दिले. या वेळी महिला सदस्यांमध्ये जोरदार वादावादी सुरू होती.

पर्यावरण अहवालावर नगरसेवकांचा अभ्यास

पिंपरी-चिंचवड शहरासाठी तयार करण्यात आलेला पर्यावरण सद्य:स्थिती अहवाल गुरुवारी सभेसमोर ठेवण्यात येणार होता. तथापि, हा प्रस्ताव चर्चेसाठी आला, तेव्हा या संदर्भात नगरसेवकांना अभ्यास करायचा आहे, असे सांगत तोपर्यंत हा विषय तहकूब ठेवावा, अशी विनंती करण्यात आली. त्यानुसार, महापौर नितीन काळजे यांनी अहवालावर पुढील सभेत चर्चा करण्यात येईल, असे स्पष्ट केले.