दहावीच्या परीक्षेसाठी पुण्यातील विमलाबाई गरवारे प्रशालेमध्ये बंदोबस्तावर असलेल्या पोलीस हवालदाराने शुक्रवारी सकाळी स्वतःजवळच्या बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली. अजम अली शेख (वय ५०, रा. वानवडी) असे या हवालदाराचे नाव आहे. सकाळी नऊच्या सुमारास शाळेतील स्टोअर रूममध्ये त्यांनी स्वतःकडील बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडली. या घटनेमध्ये ते जागीत मृत्यू पावले. शाळेच्या आवारामधून बंदुकीच्या फैरीचा आवाज आल्यानंतर कर्मचारी स्टोअर रूमकडे धावत गेले. त्यावेळी त्यांना शेख हे जमिनीवर पडल्याचे दिसून आले. दहावीच्या परीक्षेसाठी ते गुरुवारी रात्रीपासून शाळेमध्ये बंदोबस्तावर होते. शेख यांनी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, हे अद्याप उघड झालेले नाही. या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.