माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीत सत्ता कायम राखण्यासाठी राष्ट्रवादीला कडव्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. पक्षांतर्गत गटबाजीचे राजकारण, स्थानिक पातळीवर सर्वमान्य नेतृत्वाचा अभाव, महापालिकेचा गेल्या दहा वर्षांतील अनागोंदी कारभार आणि सर्वसामान्यांचे न सुटलेले प्रश्न हे राष्ट्रवादीच्या दृष्टीने कळीचे मुद्दे राहणार आहेत.
अजितदादांच्या नेतृत्वाखाली २००७ आणि २०१२ मध्ये पिंपरी महापालिकेत राष्ट्रवादीने एकहाती सत्ता घेतली. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीचा आलेख घसरला आणि दोन्हीकडे त्यांना दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. वेळोवेळी आश्वासन देऊनही अनधिकृत बांधकामे व शास्तीकर हे शहराच्या राजकारणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असलेले प्रश्न राष्ट्रवादीला सोडवता आले नाहीत, त्याचा जोरदार फटका बसला. भोसरीत विलास लांडे, पिंपरीत अण्णा बनसोडे आणि चिंचवडला नाना काटे हे ताकदीचे उमेदवार पराभूत झाले. याशिवाय, पक्षातील गटबाजीचे राजकारण चांगलेच भोवले. विधानसभेतील पराभवामागे पाडापाडीचे राजकारण होते, हे उघड गुपित होते. पिंपरी पालिकेतील राष्ट्रवादीच्या नेत्यांचा मनमानी कारभार सर्वाच्याच डोकेदुखीचा विषय बनला आहे. कोणाचेही कोणावर नियंत्रण नाही. दोन स्थानिक नेत्यांच्या हातात पालिकेची सूत्रे असून ते कोणालाही जुमानत नाहीत. वेळप्रसंगी अजितदादांनाही गुंडाळून ठेवण्याची कला त्यांच्यात आहे. नगरसेवक त्यांच्या कारभाराला कंटाळले आहेत. वारंवार तक्रारी करूनही काहीच होत नसल्याने ते हतबल आहेत. पालिका निवडणुकांसाठी सर्वमान्य होईल, असा चेहरा राष्ट्रवादीकडे नाही. गटातटाच्या व पाडापाडीच्या राजकारणाने राष्ट्रवादीला पोखरून ठेवले आहे. विरोधक म्हणून आंदोलन करतानाही गटबाजीचेच उघड प्रदर्शन सुरू आहे. आतापर्यंत स्थानिक पातळीवर विरोधी पक्ष म्हणून राहिलेले भाजप, शिवसेना आता सत्तेत आहेत. महापालिका निवडणुकाजिंकण्यासाठी त्यांचे स्वतंत्रपणे प्रयत्न सुरू आहेत. त्यांची ताकद वाढल्याचे दिसून येते. या पाश्र्वभूमीवर, पुण्यात शनिवारी-रविवारी होणाऱ्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात, पिंपरीत २०१७ च्या निवडणुकांमध्ये सत्ता टिकवण्यासाठी व्यूहरचना केली जाण्याची शक्यता आहे.