पिंपरी पालिकेतील मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदाचे कवित्व अजूनही सुरू असून डॉ. अनिल रॉय यांना दिलेली पदोन्नती नियमबाह्य़ असल्याचा आरोप वंदे मातरम संघटनेचे सरचिटणीस रमेश वाघेरे यांनी केला आहे. महापालिकेने यापूर्वी निर्धारित केलेल्या नियमांना प्रशासनाने हरताळ फासला असल्याचे निदर्शनास आणून देत न्यायालयात जाण्याचा इशारा वाघेरे यांनी दिला आहे.
आरोग्य अधिकारीपदासाठी ४ डिसेंबर २००१ मध्ये एमबीबीएस, डीपीएच व पाच वर्षांचा अनुभव अशी अर्हता निश्चित करण्यात आली. तत्कालीन घडामोडीत पाच वर्षांचा अनुभव नसल्याने डॉ. राजशेखर अय्यर यांना अपात्र ठरवून डॉ. नागकुमार कुणचगी यांची पदोन्नती झाली. याबाबतचा प्रस्ताव मान्यतेसाठी राज्यशासनाकडे पाठवला. तिथे मान्यता मिळाल्यानंतर डॉ. नागकुमारांची नेमणूक झाली. ३१ एप्रिल २०११ ला ते निवृत्त झाले. या पदासाठी सभेची मान्यता व शासनाचे आदेश असल्याने पात्रता निकषांना नियमांचा दर्जा प्राप्त झाला होता. मात्र, डॉ. रॉय यांना पदोन्नती देताना या नियमांना फाटा देण्यात आला. प्रशासन दिशाभूल करून अपात्र उमेदवाराला पदोन्नती देत आहे. आगामी सभेत हा विषय मांडण्यात येणार असून तो नियमांचे उल्लंघन करणारा आहे. रॉय यांची पदोन्नती रद्द करून पात्र उमेदवारास संधी द्यावी, अन्यथा न्यायालयात दाद मागेल, असा इशारा वाघेरे यांनी दिला आहे.