दुर्गप्रेमी आणि अभ्यासक प्रा. प्र. के. घाणेकर यांनी लिहिलेल्या ‘दुर्गदुर्गेश्वर रायगड’ पुस्तकाचे रायगडावर नुकतेच प्रकाशन झाले. रायगडावरील राजसभेत झालेल्या आगळय़ावेगळय़ा कार्यक्रमात श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह सुधीर थोरात यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
प्रा. घाणेकर यांनी लिहिलेल्या या तब्बल चारशे पानांच्या पुस्तकात रायगडाचा इतिहास, भूगोल, पुरातत्त्वीय शोध, अर्वाचीन घटना, रायगडावरील विविध सोहळे, वास्तुदर्शन, त्याचे विविध मतप्रवाह आणि संशोधन यांचा वेध घेतला आहे. उपयुक्त नकाशे, दुर्मिळ छायाचित्रांची या मजकुराला जोड दिलेली आहे.
या वेळी थोरात म्हणाले, की ‘दुर्गदुर्गेश्वर रायगड’ हा रायगडाबाबत र्सवकष माहिती देणारा असा ग्रंथ तयार झाला आहे. परिश्रमपूर्वक तयार केलेल्या या ग्रंथात रायगडाचा इतिहासापासून ते पर्यटनापर्यंत सर्वागाने वेध घेण्यात आलेला आहे. या ग्रंथाचा अभ्यासकांना उपयोग होईल. प्रा. घाणेकर यांनी या पुस्तकाचे वेगळेपण सांगत रायगडाबद्दलची आपली मते या वेळी व्यक्त केली. रवींद्र घाटपांडे यांनी प्रास्ताविक आणि आभार मानले.