दरवर्षी पाच हजार झाडांची लागवड
शहरातील हिरवाई जपली पाहिजे, टेकडय़ांचे सौंदर्य टिकले पाहिजे, देशी वृक्षांची लागवड झाली पाहिजे.. असे विचार सातत्याने मांडले जातात. त्यासाठी काही तरी करावे अशी अनेकांची इच्छाही असते; पण त्यासाठी नक्की काय करायचे ते समजत नाही. अशा सर्वासाठी पुण्यातील ‘जीविधा’ संस्थेने सुरू केलेला ‘हिरवाई महोत्सव’ उपयुक्त ठरला असून या उपक्रमाच्या माध्यमातून पुण्यात दरवर्षी हजारो देशी झाडांची लागवड यशस्वीरीत्या होत आहे.
पर्यावरणाच्या क्षेत्रात जीविधा ही संस्था काम करते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव पंडित हे वडगाव, मावळ, कामशेत वगैरे भागातील शाळांमध्ये जाऊन पर्यावरण जागृतीसंबंधीचे उपक्रम करत असत. पर्यावरण रक्षणासाठी काही उपक्रम अशा पद्धतीने झाले पाहिजे की त्यात सर्वसामान्यांनाही सहज सहभागी होता येईल, असा विचार पंडित यांनी केला आणि त्यातून ‘जीविधा’ या पर्यावरणाच्या तसेच जैवविविधतेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेची स्थापना झाली.
पर्यावरणासंबंधीचे शिक्षण देणे, जागृती करणे, या विषयावरील विविध साहित्याचे प्रकाशन, व्याख्यानांचे आयोजन आदी कामे संस्थेतर्फे सुरू आहेत. शहरातील नागरिकांचा सहभाग वाढला, तर येथील वृक्षारोपणाचे प्रमाण वाढेल हे लक्षात घेऊन संस्थेने ‘हिरवाई महोत्सव’ सुरू केला असून यंदाच्या सातव्या वर्षांत हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
पर्यावरणासंबंधीची जागृती करण्यासाठी व्याख्याने तसेच इतर कार्यक्रमांचा अंतर्भाव हिरवाई महोत्सवामध्ये केलेला असतो. या महोत्सवाच्या माध्यमातून वृक्षारोपणासाठीचे आवाहन नागरिकांना केले जाते आणि नागरिकांच्या मागणीनुसार त्यांची नावनोंदणी केली जाते. जेवढे नागरिक नावनोंदणी करतात तेवढय़ा सगळ्यांना त्यांच्या मागणीनुसार देशी वृक्षांची रोपे विनामूल्य दिली जातात. अगदी घरातील छोटय़ा जागेत, घराच्या भोवती, घरातील कुंडीत, गच्चीवर किंवा मोकळ्या जागेत जिथे कुठे नागरिकांना झाडे लावणे शक्य असेल तेथे उपयुक्त ठरतील अशी रोपे संस्था देते. त्या बरोबरच काही शाळा, संस्था यांच्याकडूनही मागणी नोंदवली जाते. त्यांच्या मागणीनुसार त्यांनाही रोपे दिली जातात. दरवर्षी किमान अशी पाच हजार रोपे संस्थेतर्फे जून महिन्यात दिली जातात आणि जे नागरिक ही रोपे नेतात ते ती यशस्वीपणे जोपासतात, असा अनुभव पंडित यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितला. देवराई ट्रस्टचे रघुनाथ ढोले यांच्याकडून ही रोपे संस्थेला दिली जातात. त्यांनी दिलेली झाडे नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची सक्षम व्यवस्था संस्थेने तयार केली असल्यामुळे दरवर्षी या उपक्रमाला मिळणारा प्रतिसाद वाढत असल्याचेही पंडित म्हणाले.
दरवर्षी नियमितपणे रोपे नेणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. तसेच अनेकजण स्वत:हून या उपक्रमाची माहिती त्यांच्या परिचितांना देतात. त्यामुळे उपक्रमाचा प्रतिसाद वाढत असल्याचेही पंडित यांनी सांगितले.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?
Understanding the scope and depth of Creative Design and how to pursue a career in it
डिझाईन रंग-अंतरं:ग ‘डिझाईन’ कसं बदलतंय तुमचं जग..!