अखिल भारतीय सांस्कृतिक संघाच्या ग्लोबल काउन्सिल ऑफ आर्ट्स अॅण्ड कल्चरतर्फे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या ‘सांस्कृतिक ऑलिम्पियाड’मध्ये पुणेकरांनी तीन सुवर्ण आणि एका कांस्य पदकाची कमाई केली आहे. गंधार कुवळेकर, ‘अंतरंग’ नाटक आणि स्वप्निल डान्स स्टुडिओ यांना सुवर्ण पदक, तर सुनीता कुवळेकर यांना कांस्य पदक मिळाले आहे.
 १४ वर्षीय गंधार कुवळेकर याला ‘ज्युनियर’ गटामध्ये तबला वादनासाठी सुवर्ण पदक मिळाले आहे. हृद्गंध प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘अंतरंग’ या एकांकिकेला ‘ओपन ग्रुप ड्रामा’ या विभागामध्ये सुवर्ण पदक मिळाले. या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन अमेय पांगारकर याने केले आहे. स्वप्निल डान्स स्टुडिओला समूह नृत्यामध्ये सुवर्ण पदक मिळाले आहे. तसेच गंधारेची आई सुनीता कुवळेकर यांना गायनामध्ये कांस्य पदक मिळाले आहे.
अखिल भारतीय सांस्कृतिक संघाच्या वतीने दरवर्षी ‘सांस्कृतिक ऑलिम्पियाड’चे आयोजन करण्यात येते. त्यामध्ये गायन, वादन, नाटक आणि इतर गोष्टींचा समावेश असतो. यंदाचे ऑलिम्पियाड दुबई येथील ‘मॉल ऑफ एमिरेट्स’ येथे डिसेंबरमध्ये पार पडले. त्यामध्ये भारत, रशिया, अमेरिका, दक्षिण आफ्रिका, कतार आदी देश सहभागी झाले होते.