पिंपरी पालिकेत निर्विवाद बहुमत दिले, आता तीन मतदारसंघातील आमदार निवडून द्या, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चारच दिवसांपूर्वी शहरवासियांना घातले. मात्र, त्यांची पाठ वळताच राष्ट्रवादीतील सुभेदारांची सुंदोपसुंदी पुन्हा सुरू झाली. ‘हॅट्रीक’च्या प्रयत्नातील आमदार विलास लांडे यांच्या समर्थक नगरसेवकांच्या बैठकीत शहराध्यक्ष व पक्षनेत्यांच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. तेव्हा, पक्षवाढीसाठी त्यांना बदला, अशी मागणी लांडे यांनीही केल्याने पक्षातील ‘बंडाळी’ पुन्हा वाढण्याची स्पष्ट चिन्हे आहेत.
आमदारकीच्या काळातील विकासकामांची माहिती देणाऱ्या संकेतस्थळाचे उद्घाटन व त्यानिमित्त कासारवाडीतील कलासागर येथे लांडे यांनी समर्थकांची बैठक आयोजित केली होती. महापौर मोहिनी लांडे, नगरसेवक अजित गव्हाणे, नितीन लांडगे, संजय वाबळे, अरुण बोऱ्हाडे, तानाजी खाडे, समीर मासूळकर, जितेंद्र ननावरे, साधना जाधव, मंदा आल्हाट, शुभांगी बोऱ्हाडे, शुभांगी लोंढे, स्वाती साने, पोर्णिमा सोनवणे, विनया तापकीर, आशा सुपे, अनुराधा गोफणे, सुनीता गवळी, मंदाकिनी ठाकरे आदी उपस्थित होते. यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल व पक्षनेत्या मंगला कदम यांच्याविषयी नगरसेवकांनी तक्रारी केल्या असता, महापौर तसेच पक्षाच्या नगरसेवकांना ते विश्वासात घेत नाहीत, मनमानी कारभार करतात. पक्षवाढीसाठी ते काम करत नसतील तर त्यांना बदलले पाहिजे, अशी मागणी लांडेंनी केली.
यापूर्वी, चिंचवडच्या मेळाव्यात निरीक्षक अंकुश काकडे व कृष्णकांत कुदळे यांच्यासमोरच लांडे यांनी बहलांच्या कार्यपद्धतीची चिरफाड केली होती. त्यानंतर, बहल यांनीही शहराध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा पवित्रा घेतला होता. दोन्ही गटातील वाढत्या आरोप-प्रत्यारोपामुळे निवडणुकांच्या तोंडावर अजितदादांना डोकेदुखी झाली आहे.
 
निवडणुका येताच आमची आठवण?
निवडणुका येताच तुम्हाला आमची आठवण आली का, असा बोचरा प्रश्न नगरसेवक तानाजी खाडे यांनी विलास लांडे यांना बैठकीत विचारला. तुम्हाला हवे ते सहकार्य आम्ही केले. मात्र, आमदार झाल्यानंतर तुम्ही विसरले. आम्हाला पद देण्याची वेळ आली, तेव्हा तुम्ही विचारलेही नाही, असा ‘घरचा आहेर’ देत पुन्हा मदत करण्याची खात्रीही त्यांनी दिली.