पाणी कपातीमुळे खराडी, वडगाव शेरी भागात चार-पाच दिवसात पाणी येत नाही. तरीही महापालिकेचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत, अशी तक्रार करत शिवसेनेचे नगरसेवक सचिन भगत यांनी सर्वसाधारण सभेत बुधवारी आंदोलन केले. महापौरांच्या आसनासमोरील मानदंड पळवून नेण्याचा प्रयत्न करून त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. सभेनंतर महापौरांच्या दालनात झालेल्या बठकीत रविवापर्यंत उपाययोजना करून पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले.
गेल्या पंधरा दिवसांपासून शहरामध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे खराडी, वडगाव शेरी या भागातील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत, अशी तक्रार करत नगरसेवक सचिन भगत यांनी फलक घेऊन सर्वसाधारण सभेत हा मुद्दा उपस्थित केला. मात्र भगत यांच्याकडे दुर्लक्ष करत सर्वसाधारण सभा तहकूब करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने केला. यामुळे संतापलेल्या भगत यांनी थेट महापौरांच्या आसनाकडे धाव घेत महापौरांच्या आसनासमोरील मानदंड पळवून नेण्याचा प्रयत्न केला. यामुळे सभागृहात गोंधळ उडाला.
गेल्या चार-पाच वर्षांपासून आमच्या भागात पाणीकपात आहे. त्यात आणखी भर पडल्याने नागरिकांना पाणी मिळत नाही. रात्री अपरात्री नागरिक घरी येऊन तक्रारी करतात. यासाठी तातडीने उपाययोजना करून खराडी, वडगाव शेरी भागाला रोज एक तास पाणी द्या, अशी मागणी सचिन भगत यांनी सभेत केली. सर्वसाधारण सभेनंतर महापौरांच्या दालनात झालेल्या बठकीत या विषयावर चर्चा झाली. बंडगार्डन येथील जलकेंद्रावर अधिक क्षमतेची मोटार बसवून खराडी, वडगाव शेरी भागाला जादा पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले जाईल, असा निर्णय बैठकीत झाल्याचे भगत यांनी सांगितले.