केवळ पुरुषांची मक्तेदारी असलेल्या शवविच्छेदनाच्या कामामध्ये गेली दोन तपे कार्यरत असलेल्या शीतल चव्हाण या युवतीच्या जीवनकथेवर लघुपटाद्वारे प्रकाश पडणार आहे. शीतलचे हे काम केवळ लघुपटाच्या माध्यमातून जगभरातील लोकांपर्यंत पोहोचवावे हाच त्यामागचा उद्देश आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रांत स्त्रिया कार्यरत आहेत. मुंबईमध्ये मेट्रो चालविणारी पहिली स्त्री असो किंवा ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक मिळविणारी युवती हा स्त्रियांच्या प्रगतीचा आलेख उंचावतच आहे. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकत अनेकींनी परंपरेला छेद देत आपल्या क्षमता सिद्ध केल्या. याच नामावलीतील एक नाव म्हणजे शवविच्छेदनाच्या क्षेत्रात काम करणारी शीतल रामलाल चव्हाण. वयाच्या सहाव्या वर्षांपासून शवविच्छेदनाचे काम करणारी शीतल आता वडिलांच्या निधनानंतर घरातील कर्ती व्यक्ती झाली आहे. कामाच्या रगाडय़ामध्ये स्वत:ला शिक्षण पूर्ण न करता आलेली शीतल तीन बहिणी आणि भावाच्या शिक्षणासाठी झटत आहे.
सर्वसामान्य माणूस हातामध्ये ब्लेड, सुरी धरतानाही सावध असतो. ज्या वयात मुली फुलांचे गजरे धाग्यात गुंफून वेणीमध्ये माळतात त्या वयातील शीतल या उपकरणांनिशी आपल्या कामासाठी सदैव सज्ज असते. भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात ती काम करते. आतापर्यंत पाच हजार व्यक्तींचे शवविच्छेदन करणाऱ्या शीतलच्या कार्याला सलाम करण्यासाठी आणि अनेकींना तिच्यापासून प्रेरणा मिळावी या हेतूने मोहिनी कारंडे यांनी या लघुपट निर्मितीचा घाट घातला आहे. संतोष संखद या लघुपटाचे दिग्दर्शन करणार असून विनिता अनगळ संकलनाची जबाबदारी सांभाळणार आहेत.
भावंडांमध्ये थोरली असलेली शीतल वडिलांसमवेत कामावर जात असे. वडिलांना मदतीसाठी आयुधे दे, मृतदेह धरायला मदत कर अशी कामे करतानाच हळूहळू ती प्रत्यक्ष शवविच्छेदन करण्यामध्ये सहभागी होऊ लागली. जिवंत माणसापेक्षा मृतदेह कमी धोकादायक असतात हे सत्य लहानपणीच उमगले आणि ती धाडसी झाली. मांढरदेवी यात्रेतील दुर्घटना, भाटघर धरणात होडी उलटून झालेल्या अपघातातील मृतदेहांचे विच्छेदन करण्यामध्ये अग्रभागी असलेली शीतल काही वेळा तातडीने कराव्या लागणाऱ्या शवविच्छेदनासाठी न थकता तयार असते. हे काम करणारी ती महाराष्ट्रातील एकमेव महिला असल्याचा दावा मोहिनी कारंडे यांनी केला आहे.