छत्रपती संभाजीमहाराज यांचा गुरुवारी बलिदान दिवस. त्यानिमित्ताने पुण्यातील सृजन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर करून छत्रपती संभाजीमहाराजांचे चरित्र त्रिमितीय चित्र रूपात (थ्रीडी) साकारले आहे. ‘शिवतेज संभाजी’ हे थ्रीडी इफेक्टवर (त्रिमितीय परिणाम) आधारित पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे.
माजी खासदार प्रदीप रावत यांनी पत्रकारपरिषदेत बुधवारी ही माहिती दिली. या पुस्तकाविषयी माहिती देताना रावत म्हणाले की, हे पुस्तक ऐतिहासिक विषयावर असल्याने ऐतिहासिक सत्यता जपणे आधिक महत्त्वाचे ठरते. छत्रपती संभाजीमहाराजांच्या जीवनप्रसंगातील ऐतिहासिक सत्यता या पुस्तकात पूर्ण पुराव्यांच्या आधारे जपण्यात आली. त्यासाठी इतिहासाचे अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी मार्गदर्शन केले आहे. या पुस्तकात प्रत्येक चित्राचे वर्णन काव्यात्मक पद्धतीने करण्यात आले असून आणि संभाजीमहाराजांच्या जीवनातील प्रसंग गोष्टीरूपाने मांडण्यात आले आहे. चित्रांचे काव्यात्मक वर्णन करण्यासाठी डॉ. सदाशिव शिवदे यांनी मार्गदर्शन केले आहे. छत्रपती संभाजीमहाराजांचे चरित्र पुस्तकरूपाने मांडणारे लेखक डॉ. सदाशिव शिवदे, शिवतेज संभाजी पुस्तकाचे लेखक संपादक संतोष रासकर, कलादत्त प्रकाशनाचे संचालक आणि माजी उपमहापौर सुरेश नाशिककर हेही यावेळी उपस्थित होते.
सृजन कॉलेज ऑफ डिझाइन या संस्थेतील विद्यार्थ्यांनी संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर करून त्रिमितीय चित्रे साकारली आहेत. त्यामुळे पुस्तकातील प्रत्येक प्रसंग जिवंत झाला आहे. तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौशल्य कौतुकास्पद असून थ्रीडी तंत्रज्ञानावर आधारित हे पहिलेच पुस्तक आहे, अशीही माहिती रावत यांनी दिली
सृजन कॉलेज ऑफ डिझाइनचे संचालक आणि पुस्तकाचे लेखक, संपादक संतोष रासकर म्हणाले की, या पुस्तकात पन्नासहून अधिक चित्रे विद्यार्थ्यांनी चितारली आहेत. सृजनच्या पन्नास विद्यार्थ्यांनी या पुस्तकाच्या निर्मितीसाठी कष्ट घेतले असून त्यांना राम देशमुख आणि गीतेश चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. या चित्रांना थ्रीडी इफेक्ट (त्रिमितीय परिणाम) देण्यासाठी सुधांशु सक्सेना, अमोल रायबोर्डे यांनी मार्गदर्शन केले आहे. प्रत्येक पुस्तकाबरोबर थ्रीडी चष्माही देण्यात येणार आहे. पुस्तकाचे प्रकाशन लवकरच करण्यात येणार आहे.