पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी झालेल्या नाटय़मयी घडामोडीनंतर लगेचच, पुण्याची इच्छा नसल्यास पिंपरी पालिकेचा ‘स्मार्ट सिटी’ योजनेत समावेश करावा, अशी मागणी भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
केंद्र सरकारने जाहीर केलेली ‘स्मार्ट सिटी’ योजना शहरांच्या विकासासाठी लाभदायक आहे. या योजनेत समावेश होण्यासाठी आवश्यक त्या प्रक्रिया पिंपरी पालिकेने पूर्ण केल्या आहेत. पुणे व पिंपरीचा एकत्रित प्रस्ताव मंजुरीसाठी गेल्याने पुण्याची वर्णी लागली व पिंपरीला नकार मिळाला. बुधवारी झालेल्या सभेतील कामकाजाचे स्वरूप पाहता ‘स्मार्ट सिटी’वरून पुण्यात ‘राजकारण’ सुरू झाल्याचे दिसून येते. कदाचित पुणे ‘स्मार्ट सिटी’तून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. तसे होत असल्यास पिंपरी-चिंचवडचा समावेश करावा, तशी शिफारस केंद्र सरकारकडे करावी, अशी मागणी जगतापांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.