पुण्यातील एका आजींनी अमेरिकेतील मुलीकरिता दिवाळीसाठी फराळ पाठवला. तो वेळेत पोहोचावा म्हणून दिवाळीच्या दहा दिवस आधीच पाठवून दिला. कुरियर कंपनीने तो चार-पाच दिवसांत पोहोचेल असे सांगितले खरे, पण प्रत्यक्षात दिवाळी सुरू झाली तरी फराळ पोहोचला नाही. अजून किती दिवस हे सांगता येत नाही आणि कुरियर कंपनीकडून समाधानकारक उत्तरेही देण्यात येत नाहीत.
हा अनुभव आहे, कोथरूडमध्ये राहणाऱ्या मीना गोखले यांचा. त्यांनी याबाबत ‘लोकसत्ता’ ला माहिती दिली. गोखले यांच्याप्रमाणेच इतर अनेकांना असा त्रास सहन करावा लागला आहे.
गोखले यांची मुलगी अमेरिकेत वॉशिंग्टनजवळील श्ॉन्टेली शहरात राहते. त्यांनी १२ ऑक्टोबर रोजी मुलीसाठी फराळ आणि कपडे पाठवले. हा फराळ दिवाळीत मिळावा या उद्देशाने त्यांनी तो लवकर पाठवला. कर्वे रस्त्यावरील कुरियर कंपनीत त्यांनी तो पोहोचवला. चार-पाच दिवसांत पार्सल पोहोचेल, असे त्यांना सांगण्यात आले. पण आता दहा-अकरा दिवस उलटले तरी पार्सल मिळालेले नाही. याबाबत गोखले यांनी सतत पाठपुरावा केला. त्या वेळी कंपनीकडून सांगण्यात आले की, कस्टमकडून पार्सल तपासली जातात, त्यामुळे ती पोहोचण्यास वेळ लागत आहे. असाच अनुभव इतरही ग्राहकांना आला असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. याच्यापलीकडे पार्सल कधी पोहोचेल याबाबत काहीच सांगण्यात येत नाही. त्यामुळे आता काय करायचे, हा प्रश्न पडला आहे. त्यांच्या मुलीने अमेरिकेत संबंधित कंपनीकडे चौकशी केली, तेव्हा अमेरिकेत अजून पार्सल पोहोचलेच नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे दिवाळीसाठी पाठवलेला फराळ दिवाळी संपली तरी मिळणार का, असा सवाल गोखले यांनी केला.

‘‘मी मुलीसाठी गेल्या १२ तारखेला कर्वे रस्त्यावरील कंपनीमार्फत कुरियर पाठवले. त्यात  फराळ व कपडे असे १०-११ हजार रुपयांचे साहित्य होते. याशिवाय ते पाठविण्यासाठी सात हजार रुपये खर्च केले. या कंपनीशी संबंधित असलेल्या लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर ते सकारात्मक प्रतिसाद देत नाहीत. उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. फराळ खराब झाला आणि उशिराने पोहोचला तर त्याचा उपयोग काय? इतरही अनेकांना असाच अनुभव आल्याचे सांगितले जात आहे. पण याचे कारण कोणीही सांगत नाही.’’
– मीरा गोखले, कोथरूड