पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील धोकादायक दरडी काढण्याचे काम सुरू असल्याने या मार्गावरील वाहतूक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वळविण्यात आली आहे. त्यामुळे जुन्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असून वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे. शनिवार व रविवारी पुण्याला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठय़ा संख्येने वाहने आल्याने कोंडीत आणखीच भर पडली. याबाबत प्रवासी आणि स्थानिकांनाही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
द्रुतगती मार्गावरील धोकादायक दरडी हटविण्याचे काम शुक्रवारपासून सुरू करण्यात आले. काम सुरू असताना द्रुतगती मार्ग बंद ठेवण्यात आल्याने या मार्गावरील वाहतूक जुन्या मार्गाने वळविण्यात आली. जुन्या मार्गावर मोठय़ा संख्येने वाहने आल्याने वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला. प्रवाशांना अनेक तास वाहनातच अडकून राहावे लागले. लहान मुले, वृद्ध व महिलांना मोठा त्रास सहन करावा लागला. अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनाही या वाहतूक कोंडीचा फटका बसला. खालापूर टोलनाका ते सायमाळ या दरम्यान हजारो वाहने अडकून पडली होती. खोपोली शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पहायला मिळत होते.
आडोशी बोगद्याजवळ धोकादायक दरडी काढण्याचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतले आहे. काम सुरू असताना अडथळा येऊ नये, म्हणून बोरघाटापासून खालापूर टोलनाक्यापर्यंतची वाहतूक जुन्या मार्गावरून वळविण्यात आली आहे. द्रुतगती मार्ग सहा पदरी असून जुना मुंबई-पुणे महामार्ग चार पदरी आहे. एकाच वेळी दहा पदरी मार्गावरून धावणारी वाहने चार पदरी मार्गावर आल्याने शुक्रवारपासून मोठय़ा वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागला. पोलीस भर पावसातही वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करत होते, तरीही वाहनांची संख्या वाढल्याने पोलीसही हतबल झाल्याचे चित्र होते. शनिवार व रविवारी पुण्याला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. त्यामुळे हजारो वाहने रस्त्यावर आली असून लोणावळ्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रविवारी सुट्टी असल्याने अनेक जण बाहेर पडण्याची शक्यता आहे. तर सोमवारी आषाढी एकादशी असल्याने पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना या वाहतूक कोंडीचा फटका बसण्याची भीती आहे. बोरघाट ते खालापूर टोलनाका या दरम्यानचा मार्ग अरुंद आहे. पोलिसांनी पुणे व मुंबईकडे जाणारी वाहने एकाच रस्त्याने सोडल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. याचा फटका स्थानिकांनाही बसत असून विद्यार्थी, कामगार यांना वाहतूक कोंडीमुळे वेळेत पोहचता येत नसल्याचे चित्र आहे. वाहतूक कोंडीमुळे अनेकांनी कामावर न जाता घरीच राहणे पसंत केले. पालकांनीही विद्यार्थ्यांना शाळेत पाठविले नव्हते. त्यामुळे द्रुतगती मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह स्थानिकांमध्येही संतापाचे वातावरण आहे.