बत्तीस लाखांची लोकसंख्या असलेल्या पुणे शहरामध्ये वाहनांची संख्या प्रतिमाणशी एक या प्रमाणापर्यंत गेली असताना शहरात प्रदूषणाचा धोकाही मोठय़ा प्रमाणावर वाढला आहे. हवेतील प्रदूषणाला कारणीभूत विविध घटक असले, तरी त्यात वाहनांची वाढती संख्या हाही एक महत्त्वाचा घटक आहे. त्यातून आरोग्यास घातक असलेल्या नायट्रोजन ऑक्साईड व धूलिकणांमधील कार्बनकणांचे प्रमाण वाढत चालले आहे. शहरातील प्रमुख चौकांनी धोक्याची पातळी केव्हाच ओलांडली आहे. प्रदूषणाचा हा धोका वाढत असताना कोणत्याही शहराच्या तुलनेत पुण्यामध्ये असलेल्या सर्वाधिक वृक्षांमुळे पुणेकरांचा बचाव होत असल्याचेही दिसून येत आहे.
वाढत्या प्रदूषणाच्या प्रश्नावर दिल्लीत वाहनांवर र्निबध आणण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे प्रदूषणात वाढ करणाऱ्या जास्त क्षमतेचे इंजिन असणाऱ्या मोटारींची नोंदणीही थांबविण्यात येणार आहे. त्यामुळे हवेतील प्रदूषणास वाहनांची वाढती संख्या सर्वाधिक कारणीभूत असल्याचे स्पष्टच आहे. पुणे शहरही आता त्या धोक्याच्या वळणावरून जात आहे. शहरात वाहने वाढत असताना वाहतुकीची कोंडी शहरात नित्याची झाली आहे. त्यामुळेही वाहनातून निघणाऱ्या धुराचे प्रमाण वाढत चालले आहे.
हवा प्रदूषित करणाऱ्या घटकांमध्ये नायट्रोजन ऑक्साईड वायू प्रामुख्याने असतो. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने या वायूच्या पातळीचे मानकानुसार प्रमाण ४० मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर ठरवलेले आहे. मात्र, महापालिकेच्या पर्यावरण प्रयोगशाळेच्या आकडेवारीनुसार पुण्यामध्ये मागील काही वर्षांमध्ये कधीच या मानकानुसार नायट्रोजन ऑक्साईडचे प्रमाण राहिलेले नाही. हे प्रमाण काही ठिकाणी ऐंशी ते शंभरपेक्षा अधिकच आढळून येते आहे. त्याचप्रमाणे धूलिकणांच्या पातळीचे मानक प्रतिघनमीटर ६० मायक्रोग्रॅम ठरवून दिलेले आहे. पण, शहरात धूलिकणांनीही धोक्याची पातळी केव्हाच ओलांडली आहे. हे प्रमाण बहुतांश ठिकाणी तब्बल दोनशे मायक्रोग्रॅम आढळून येते. त्यात कार्बनकणांचा वाटा मोठा आहे. शहरात दरवर्षी दोन ते अडीच लाख नव्या वाहनांची भर पडत असताना प्रदूषणाचा हा धोका वाढतच जाणार आहे.
शहरातील नळ स्टॉप चौक, खंडुजी बाबा चौक, स्वारगेट येथील जेधे चौक, ढोले पाटील चौक, टिळक चौक, भापकर चौक, अभियांत्रिकी महाविद्यालय चौक आदी ठिकाणी धोक्याच्या पातळीपेक्षा दुप्पट-तिप्पट प्रमाणात प्रदूषणाची पातळी नोंदवली जात आहे. हा धोका वाढत असताना शहरातील वृक्ष पुणेकरांचा बचावच करीत असल्याची समाधानकारक बाब पुढे येत आहे. प्रतिहेक्टर किती वृक्ष असावेत, या शासकीय मानकापेक्षाही पुण्यात जास्त वृक्ष आहेत. पालिकेने केलेल्या वृक्षगणनेनुसार शहरात ३८ लाख ६० हजार वृक्ष आहेत. त्यानुसार प्रतिहेक्टरमध्ये सरासरी १५४ वृक्ष असल्याचे दिसून आले आहे. प्रतिमाणसी एकापेक्षाही अधिक वृक्ष शहरात असल्याचे आकडेवारी सांगते. पुणेकरांना सध्या तरी वृक्षांनी आधर दिला असला, तरी भविष्यात वाढणारे प्रदूषण रोखण्यासाठी वेळीच ठोस उपाययोजनांची गरज असल्याचे अधोरेखित होते आहे.
वाहन तपासणीतील ढिलाई देखील कारणीभूत
प्रवासी व मालवाहतुकीमध्ये असलेल्या प्रत्येक वाहनाला दरवर्षी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून तंदुरुस्ती प्रमाणपत्र (फिटनेस) घ्यावे लागते. हे प्रमाणपत्र देण्यापूर्वी वाहन निरीक्षकाकडून त्या वाहनाची पूर्णपणे तपासणी होणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे संबंधित वाहन मानकांपेक्षा जास्त धूर हवेत सोडत नसल्याचेही काटेकोरपणे तपासणे आवश्यक असते. मात्र, वाहन निरीक्षकांची अपुरी संख्या व ‘अर्थपूर्ण’ संबंधातून अनेक वाहनांची केवळ कागदोपत्रीच तपासणी करून त्यांना तंदुरुस्ती प्रमाणपत्र दिले जाते. त्यामुळेच काळाकुट्ट धूर ओकत चाललेली वाहने शहराच्या रस्त्यांवर दिसतात. त्याचप्रमाणे प्रदूषणाबाबतचे प्रमाणपत्र (पीयूसी) देणाऱ्या बहुतांश केंद्रात वाहनाची कोणतीही तपासणी न करताच प्रमाणपत्र दिले जाते. शहरातील काही चौक व पेट्रोल पंपांवर केवळ पैसे घेऊन व अंदाजे आकडेवारी टाकून हे प्रमाणपत्र सर्रास दिले जाते. या प्रकारातूनही प्रदूषण वाढीला कारणीभूत ठरणारी वाहने रस्त्यावर धावतात.