यंदाच्या हंगामात प्रथमच पडलेल्या जोरदार पावसाने पुणेकरांना सोमवारी दिलासा दिला. मात्र, दिवसभराच्या या पावसाने सार्वजनिक सेवांची मात्र दैना उडाली. पाऊस यायचाच अवकाश, लगेच रस्त्यांवर पाणी साचले, चौकांमध्ये पाणी तुंबले, पाणी तुंबल्यामुळे जागोजागी वाहतूककोंडी झाली आणि मग पाण्याला वाट करून देताना ठिकठिकाणी महापालिका कर्मचाऱ्यांचीही तारांबळ उडाली.
प्रदीर्घ काळ पावसाची प्रतीक्षा केल्यानंतर सोमवारी सकाळपासूनच पुण्यात जोरदार पाऊस सुरू झाला आणि पाठोपाठ रस्त्यावर पाणी साचून राहण्याचेही प्रकार सुरू झाले. अनेक मोठय़ा रस्त्यांना अखंड बांधीव दुभाजक बसवण्यात आले आहेत. त्यामुळे प्रमुख चौकांमध्ये तसेच रस्त्यावर पाणी साचल्यानंतर पाण्याला वाहून जायला वाटच मिळत नव्हती. त्यामुळे चौकांमध्ये तसेच रस्त्यांवर साचलेले पाणीही वाढत गेले. महापालिकेच्या आपत्ती निवारण कक्षातर्फे अशा काळात तातडीने कार्यवाही करण्याचे नियोजन केले जाते. यापूर्वी झालेल्या एक-दोन पावसांमुळे पाणी साचून राहण्याची ठिकाणे लक्षात आली होती. त्या तयारीप्रमाणे पाणी वाहून जाण्यासाठीचे नियोजन व कार्यवाही अपेक्षित होती. प्रत्यक्षात मात्र तसे काही नियोजन सोमवारी शहरात दिसले नाही. शेतकी महाविद्यालय चौक, पुणे स्टेशन परिसर, स्वारगेट, कर्वे रस्ता तसेच मध्य पुण्यातील बहुतेक भागात पाणी साचले होते. त्यामुळे वाहनचालकांची मार्ग काढताना तारांबळ होत होती आणि दुचाकीचालकांना तर अंगावर उडणारे पाणी चुकवत चुकवत वाहन चालवावे लागत होते. शेतकी महाविद्यालयाच्या चौकात आणि रस्त्यावर गुडघाभर पाणी होते. त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा येत होता.
अनेक रस्त्यांवर साचलेले पाणी वाहून जात नसल्याचे लक्षात आल्यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांनी थेट ड्रेनेजचीच झाकणे उघडण्याचे काम हाती घेतले. ही झाकणे शोधून ती उघडी केल्यानंतर काही प्रमाणात पाण्याचा निचरा होत होता. मात्र, काही रस्त्यांवर झाकणे उघडूनही पाणी वाहून गेले नाही. सातत्याने पाणी साचून राहणाऱ्या चौकांसाठी स्वतंत्र उपाययोजना करण्यात आल्याचे महापालिका प्रशासनातर्फे सांगितले जात असले, तरी एकच दिवस झालेल्या जोरदार पावसानंतर ही पावसाळी हंगामातील तयारी फारशी प्रभावी झाली नसल्याचेच चित्र शहरात सोमवारी जागोजागी दिसले.