नगरसेवकांशी खटके; प्रशासनाला सुनावले

‘दुहेरी निष्ठे’च्या मुद्दय़ावरून राजकीय ‘सँडविच’ झालेल्या आणि सध्या कोणी ‘गॉडफादर’ नसल्याने आला दिवस ढकलण्याचेच काम करणाऱ्या महापौर शकुंतला धराडे यांनी पालिका सभेत कधी नव्हे ते घेतलेल्या आक्रमक पावित्र्यामुळे नगरसेवक अवाक झाले. स्वत:ला पाहिजे तसे सभागृह चालवणाऱ्या एका माजी महापौराची सूचना फेटाळून लावून त्यांनी त्यांचा ‘रिमोट कंट्रोल’ आपल्यावर चालत नाही, असे दाखवण्याचा प्रयत्नही केला.

महापौरांचा रक्तदाब कमी झाल्याने यापूर्वीची सभा तहकूब करावी लागली होती. ती सभा सोमवारी दुपारी पार पडली. सभेचे कामकाज सुरू झाल्यापासून महापौरांचा आक्रमक पवित्रा दिसून येत होता. अवघ्या दीड तासात त्यांनी रेटून सभेचे कामकाज पूर्ण केले. त्यांच्या या घाईमुळे व सभागृहात बोलू न देण्यामुळे अनेक सदस्यांशी त्यांचे खटके उडाले. प्रशासनालाही त्यांनी खडे बोल सुनावले. तर, स्वत:ची हतबलताही त्यांनी व्यक्त केली.

चिखलीतील शाळेच्या वादग्रस्त प्रस्तावावर चर्चा होऊ द्या, अशी सूचना त्यांच्यावर ‘रिमोट कंट्रोल’ चालवणाऱ्या नेत्याने खालून केली. मात्र, ‘माझे मला ठरवू द्या. महापौर म्हणून मला काही अधिकार आहेत की नाही,’ असे ठणकावून सांगत त्यांनी त्या विषयावर चर्चा होऊ दिली नाही. विषय तहकूब करायचा आहे. मग, चर्चा कशासाठी असा प्रतिप्रश्नही त्यांनी चर्चेचा आग्रह धरणाऱ्या अन्य नगरसेवकांना केला. अभियंत्यांच्या पदोन्नतीचा विषय सभावृत्तान्त कायम होण्याची वाट न पाहता मंजूर करण्याची पक्षनेतृत्वाची सूचना त्यांनी अमान्य केली. नियमानुसार कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्याला रुजू करून घेण्यात आल्याच्या मुद्दय़ावरून प्रशासनावरही त्यांनी कडक ताशेरे ओढले.